ठाणे, कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचा पुन्हा कहर, एकाच दिवसात एक हजार रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:08 AM2021-03-18T10:08:17+5:302021-03-18T10:09:36+5:30
कोरोना वाढत असल्याने नागपूर, पुणे यासारख्या शहरांत कडक लॉकडाऊन अमलात आला आहे. मात्र अद्याप ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत तितके कडक निर्बंध लागू केलेले नाहीत.
ठाणे : गेले काही दिवस अनेक निर्बंध लादूनही ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण तसूभरही कमी झाले नाही. उलट वाढता वाढता वाढे अशा पद्धतीने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. बुधवारी ठाण्यात कोरोनाचे ४९३ नवे रुग्ण आढळले, तर कल्याण-डोंबिवलीत ५९३ नवे रुग्ण आढळले. यामुळे केवळ या तीन शहरांमधील रुग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे.
कोरोना वाढत असल्याने नागपूर, पुणे यासारख्या शहरांत कडक लॉकडाऊन अमलात आला आहे. मात्र अद्याप ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत तितके कडक निर्बंध लागू केलेले नाहीत. त्यामुळे अनेक लोक विनामास्क राजरोस फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. कोरोनाचे भय लोकांच्या मनात एक तर कमी झाले आहे किंवा बंधने पाळण्यास लोक विटले आहेत.
या तिन्ही शहरांत प्रचंड गर्दी असून, एकाचवेळी हजारो लोक बंधने पायदळी तुडवत असल्यास त्यांच्यावर कारवाई करून नियम न पाळल्यास कारवाई अटळ आहे, असा संदेश ठळकपणे देण्यात संबंधित महापालिकांना यश आलेले नाही. दररोज काही शेकडा लोकांवर कारवाई होते. पण नियम तोडणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत ती संख्या नगण्य आहे.
सध्या विवाह सोहळ्यांना या शहरांत ऊत आला आहे. अनेक विवाह सोहळ्यांत निमंत्रितांचे बंधन पाळले जात नाही. गावात होणारी लग्ने, हळदीचे कार्यक्रम, डीजे लावून नाचगाणी याला एकाचवेळी शेकडो लोक हजर असतात.
भाजप, मनसेचा असहकार
मनसेच्या नगरसेवकांनी, नेत्यांनीही मास्क घालणे बंद केले आहे. भाजप हा राज्यातील विरोधी पक्ष असून, राज्य सरकार कोरोनाची हाताळणी करण्यात व लसीकरण करण्यात कसे अपयशी ठरले आहे, हे सिद्ध करण्याकरिता भाजप झटत आहे.
केडीएमसीत निर्बंध लागू
कल्याण : वाढत्या रुग्णांमुळे कल्याण-डोंबिवलीत आयुक्तांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार लग्न सभारंभाला ५०, तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. होम क्वारंटाइन रुग्णाच्या हातावर शिक्का मारला जाईल.