ठाण्यात कोरोनाचे निर्बंध पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:35+5:302021-06-09T04:49:35+5:30
ठाणे : राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर, सोमवारी अनलॉकच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी ओसंडून वाहत होती. ...
ठाणे : राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर, सोमवारी अनलॉकच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी ओसंडून वाहत होती. कोर्ट नाका ते रेल्वे स्थानकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन कुठेही झाले नाही की, गर्दी टाळण्याचे भानही ठाणेकरांना राहिले नसल्याचेच दिसून आले. लोकल प्रवास अद्यापही बंद असल्याने, शहराच्या विविध भागांत वाहतूककोंडी झाली होती. आनंदनगर टोल नाक्यावरही सकाळच्या सत्रात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकूणच अनलॉकच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडविल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, सरकारने १८ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार, निर्बंध हटविण्याच्या पाच स्तरांमध्ये ठाणे हे दुसऱ्या स्तरात मोडले गेले आहे. त्यामुळे सोमवारपासून अत्यावश्यक सेवांसह इतर आस्थापनाही सुरू झाल्या. रस्त्यांवरील फेरीवाल्यांची संख्या अचानक पाच पटीने वाढल्याचे दिसून आले. शहरातील विविध रस्त्यांना लावलेले बॅरिकेड्स हटविण्यात आले. त्यामुळे वाहनांची संख्या वाढल्याने, शहरात विविध ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर टोल नाक्यावर पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही नागरिक तर मास्क न लावताच फिरत होते. मॉर्निंग वॉक व सायंकाळी फेरफटका मारणारेही मास्कविनाच पाहायला मिळाले.
शहरातील सलून, जीम सुरू झाल्या आहेत. मॉल, शॉपिंग सेंटरही ५० टक्के क्षमतेने सुरू झाले आहेत. तेथेही खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसत होती. सलूनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात असल्याचे दिसत होते. काही ठिकाणी पीपीई किट घातल्याचे दिसत होते, तर काही ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांसाठी खुर्ची सतत सॅनिटाइज केली जात होती, तसेच जीमध्येही सॅनिटायझरचा वापर करून सराव करू दिला जात होता.
पावसाळी साहित्याची खरेदी जोमात
- जांभळी नाका मार्केटमधील सर्वच दुकाने खुली झाली आहेत. त्यामुळे तेथे पावसाळ्यानिमित्त चपला, रेनकोट, छत्री, ताडपत्री खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढताना दिसत होती. सोशल डिस्टन्सिंगचा नियम तेथे पार धाब्यावर बसविला गेला होता. तेथे रस्त्याच्या कडेला बसलेल्या फेरीवाल्यांचाही त्रास वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळपासून तेथे वाहतूककोंडी झाली होती.
रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते ‘ब्लॉक’
- पूर्वी मार्केटमधून परिवहनच्या बस सुरळीतपणे जात होत्या, परंतु सोमवारी अनलॉक होताच, कोर्ट नाक्यापासून ते थेट रेल्वे स्थानकापर्यंत केवळ गर्दीमुळे या भागात वाहतूककोंडी झाली होती. हेच चित्र चिंतामणी चौक ते रेल्वे स्थानकापर्यंत दिसून आले. त्यामुळे या भागात गर्दी आणि वाहतूककोंडीमुळे अक्षरशः कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडविल्याचे दिसत होते.
---------------