दिव्यांगांच्या मुळावर कोरोना, तीन महिन्यांपासून लाभार्थी पेन्शनपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 10:46 PM2020-07-16T22:46:36+5:302020-07-16T22:47:51+5:30
तीन महिने नाही मिळाली पेन्शन
कल्याण - कोरोनाचा फटका दिव्यांगांनाही बसला असून केडीएमसीची यंत्रणा त्यात व्यस्त झाल्याने लाभार्थी दिव्यांगांना तीन महिने पेन्शनच मिळालेली नाही. पेन्शनसाठी अकार्यक्षमतेचा दाखला सादर करण्याची अट महापालिकेच्या महासभेने डिसेंबरमध्ये वगळताच दिव्यांगांना पेन्शन लागू करण्यात आली आहे. परंतू सद्यस्थितीला कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर कर्मचारी वर्गाची वानवा आहे. त्यामुळे कार्यवाहीला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी दिव्यांगांना पेन्शनपासून वंचित राहावे लागले आहे.
2016 च्या सुधारीत प्रस्तावानुसार पाच टकके निधी दिव्यांगांसाठी खर्च करावयाचा आहे. याअंतर्गत 60 वर्षावरील व सरकारी रूग्णालयांनी काम करण्यास अकार्यक्षम घोषित केलेल्या दिव्यांगांना पेन्शन देण्यात येते. यावर राज्यातील इतर महापालिकेत मागेल त्याला सरसकट पेन्शन दिली जात होती. मात्र केडीएमसीच्या रूग्णालयातून अकार्यक्षमतेचा दाखलाच दिला जात नसल्याने पेन्शनपासून दिव्यांगांना वंचित राहावे लागत होते. या मुद्याकडे डोंबिवलीमधील दिव्यांग दत्तात्रय सांगळे यांनी केडीएमसी प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी महासभेत अकार्यक्षमतेचा दाखला बंधनकारक केल्याची अट वगळण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. त्याला 20 डिसेंबरच्या महासभेत मान्यता मिळाल्याने दिव्यांगांना पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अट वगळताच महिला व बालकल्याण समितीच्या सभेत दाखल झालेल्या 181 जणांना पेन्शन लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली यात टप्प्याटप्याने लाभाथ्र्यामध्ये वाढ करण्यात आली. दरम्यान गेल्या तीन महिन्यापासून लाभार्थी दिव्यांगांच्या बँक खात्यात पेन्शन जमा झालेली नाही. सद्यस्थितीला कोरोनामुळे उदभवलेली परिस्थिती आणि त्यात कर्मचा-यांची वानवा असल्याने कार्यवाही होऊ शकलेली नाही असे उत्तर दिव्यांगांना दिले जात आहे. दरम्यान संबंधित प्रस्ताव प्रशासनाकडून लेखाविभागाकडे पाठविण्यात आला आहे. पेन्शन अदा केली जाईल अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण योजना विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट यांनी लोकमतला दिली.
मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली जाईल
एप्रिल, मे, जून महिन्याचे दिव्यांगांचे थकित पेन्शन त्वरीत एकत्रित देण्यात यावे. पेन्शन दरमहा 15 तारखेर्पयत देण्याची तजवीज करावी याची कार्यवाही तातडीने व्हावी अन्यथा प्रशासनास दिव्यांगप्रश्नी स्वारस्य नसल्याचे समजून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केडीएमसी परिक्षेत्रतील दिव्यांगांच्या प्रश्नी साकडे घालून दाद मागण्यात येईल - दत्तात्रय सांगळे दिव्यांग