कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही लागणार नववर्ष स्वागतयात्रेला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:53 PM2021-03-11T23:53:56+5:302021-03-11T23:54:10+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी ठाणे शहरात निघणारी स्वागतयात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही नववर्ष स्वागतयात्रेला परवानगी मिळणार नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या यात्रेचे मुख्य आयोजक श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने या दिवशी स्वागतयात्रा न काढता सर्वांना मान्य होईल, असा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात शुक्रवारी सायंकाळी बैठक होणार आहे.
ठाणेकरांचा सहभाग असणारी स्वागतयात्रा कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता रद्द करण्यात आली आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्याने गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेपासून वर्षभरातील सर्व सण-उत्सवांनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. यंदा जानेवारी महिन्यात कोरोना आटोक्यात आल्याने स्वागतयात्रा होईल, असे वाटत होते. मात्र, फेब्रुवारी अखेरपासून मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा स्वागतयात्रेच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.
नववर्ष स्वागतयात्रेत ठिकठिकाणांहून येणाऱ्या संस्था, चित्ररथ, आबालवृद्ध यांचा सहभाग असतो. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होण्याची दाट शक्यता असल्याने लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही यात्रा रद्द करण्यात आली. ठाणेकरांना स्वागतयात्रेचे विस्मरण होऊ नये म्हणून छोटेखानी कार्यक्रम करण्याचा न्यासाचा मानस आहे. अर्थात, त्यास परवानगी मिळणार का व त्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असणार, यावर सर्व अवलंबून असेल.
यंदाची स्वागतयात्रा होणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. परंतु, सर्वांना मान्य असेल, सहभागी संस्था दूर जाणार नाहीत, असा कार्यक्रम करण्याची चर्चा सुरू आहे. अनेक प्रस्ताव आले आहेत. त्यावर, शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या बैठकीत एकमताने निर्णय घेऊ.
- उत्तम जोशी,
अध्यक्ष, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे