कळव्यात अवघ्या ४५० रुपयांत कोरोना चाचणी; ‘एक्स रे’द्वारे होणार निदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 01:24 AM2020-05-29T01:24:34+5:302020-05-29T01:24:46+5:30
पाच मिनिटांत मिळणार अहवाल, नागरिकांना दिलासा
ठाणे : कोरोनाची तपासणी महाग असल्याने अनेक गरिबांना ती करणे शक्य होत नाही. परिणामी, रुग्णांची अचुक संख्या मिळत नसल्याने कोरोनावर मात करणे अवघड होत आहे. त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या ईएसडीएस कंपनीने विकसीत केलेले तंत्रज्ञान आता ठाणे शहरातही आले असून कळवा येथे याद्वारे अवघ्या साडेचारशे रुपयांमध्ये ही टेस्ट करण्यात येणार असून पाचच मिनिटांमध्ये तिचा अहवालही मिळत आहे.
सध्या ओमान, दुबई या देशांसह केरळ या राज्यात एक्स-रेद्वारे कोविडची टेस्ट करण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेनेही हे तंत्रज्ञान स्वखर्चाने सुरू करून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून एका व्हॅनद्वारे सबंध शहरामध्ये ही चाचणी सुरू केली आहे.
छातीच्या एक्स-रेचा अभ्यास करून त्याद्वारे शरिरात गेलेला कोरोना विषाणू, त्याचे प्रमाण- टक्केवारी आदींची विस्तृत माहिती मिळवणे शक्य होत आहे.
विशेष म्हणजे, एखाद्या रुग्णाने बाहेरून आपला एक्स- रे काढला तरी त्याची तपासणी करून अवघ्या २०० रुपयांमध्ये ही चाचणी करणे शक्य आहे. या चाचणीमध्ये कोरोनाचे प्रमाण आणि त्यावर रुग्णालयात दाखल करणे किंवा क्वारंटाईन करणे गरजेचे आहे का? याचा अंदाज बांधणे सोपे जात आहे. सध्या लॅबमध्ये तपासणीसाठी प्रतिव्यक्ती साडेचार हजार खर्च येतो.
परंतु, या तपासणीद्वारे अवघ्या साडेचारशे रुपयांत अवघ्या पाचच मिनिटांत संभाव्य धोका तपासता येणार आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्याचे निदर्शनात आल्यास केवळ अशा व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. त्यामुळे चाचण्यांवरील ताण कमी होईल.
सध्या कळवा, खारीगाव, पारसिकनगर, विटावा, गणपतीपाडा येथील रहिवाशांसाठी ही सुविधा सुरू केलेली आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य सेनानी कावेरीताई पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष मिलींद पाटील यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
गरोदर मातांची कोविड चाचणी मोफत
कल्याण : केडीएमसीचे १० तापाचे दवाखाने, रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालय येथून संदर्भीत केलेले रुग्ण, टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर येथील संशयित रुग्ण तसेच शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालय येथे नोंदणी केलेल्या गरोदर माता यांची कोविड तपासणी महापालिकेतर्फे मोफत करण्यात येत आहे. नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला असल्यास महापालिकेच्या तापाच्या दवाखान्यात किंवा शास्त्रीनगर रुग्णालयात संपर्क करावा. त्यांची कोविड तपासणी मोफत केली जाईल, असे मनपा प्रशासनाने कळविले आहे.
मसाला मार्केट पुन्हा बंद
ठाणे : खारकर आळी परिसरात कोरोनाचा रूग्ण सापडल्यावर जांभळी येथील किराणा मालाची घाऊक बाजारपेठ बंद केली. ग्राहकांची मागणी लक्षात घेता काही वेळासाठी मसाला मार्केट सुरू होते, मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता तेही बंद केले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून या दिवसात मसाले, मिरचीला असलेली ग्राहकांची मागणी लक्षात घेता गेल्या चार-पाच दिवसांपासून बाजारपेठेतील मसाला मार्केट सुरू केले होते. मात्र, गर्दी झाल्याने तेही बंद करण्यात आले.