कल्याण-डोंबिवलीच्या पीपीपी तत्त्वावरील लॅबमध्ये एक लाख जणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:30 AM2021-02-19T04:30:44+5:302021-02-19T04:30:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. महापालिका हद्दीतील आरोग्य सेवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. महापालिका हद्दीतील आरोग्य सेवा अपुऱ्या होत्या. त्यामुळे इतक्या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी काय करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर होता. कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात होत्या. सगळ्य़ात महत्त्वाचे कोरोना टेस्टचे प्रमाण वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी खासगी लॅबवर अवलंबून न राहता महापालिकेने गौरीपाडा येथे पीपीपी तत्त्वावर लॅब सुरू केली. या लॅबमध्ये आतापर्यंत एक लाख जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
महापालिकेकडे १५ नागरी आरोग्य केंद्रांसह कल्याणमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय आहे. त्यापैकी शास्त्रीनगर रुग्णालयास कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. महापालिकेच्या हद्दीत कोविड टेस्ट सेंटर होते. ते खासगी पॅथॉलॉजी लॅबचे होते. महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून कोविड टेस्ट केली जात होती. मात्र दाट लोकवस्ती असलेल्या कल्याण-डोंबिवलीत कोरोना टेस्टचे प्रमाण वाढविणे गरजेचे होते. निदान लवकर झाले तर प्रादुर्भाव रोखून उपचार लवकर सुरू करता येईल, हा उद्देश होता. खासगी लॅबमध्ये टेस्ट केल्यावर चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागत होता. काही ठिकाणी तर तीन दिवस उलटून जात होते. अहवाल आल्याशिवाय रुग्णालये उपचार करू शकत नाहीत. या सगळ्य़ा गोष्टी लक्षात घेता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने पीपीपी तत्त्वावर कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील जागेत कोरोना टेस्टिंग लॅब जून महिन्याच्या अखेरीस सुरू केली. या लॅबची क्षमता दिवसाला ३ हजार सॅम्पल गोळा करून त्याचा अहवाल देण्याची होती. मुंबईच्या रुग्णालयावर अहवालासाठी अवलंबून राहणे या लॅबमुळे बंद झाले. कल्याण-डोंबिवलीच नव्हे तर आसपासच्या शहरातील नागरिकांना टेस्टिंगसाठी लॅब उपलब्ध झाली. टेस्टचा अहवाल लवकर मिळू लागला.
------------
कल्याण-डोंबिवली महापालिका टेस्टिंग लॅबची संख्या- १
आतापर्यंत या लॅबमध्ये झालेल्या चाचण्या : १ लाख
लॅबमध्ये सुरुवातीला ५० जणांचा स्टाफ, सध्या ४० जणांचा स्टाफ कार्यरत
---------------
मोजक्याच रिपोर्टबाबत तक्रारी..
लॅबच्या काही रिपोर्टमध्ये त्रुटी आढळल्या. अशा सहा तक्रारी प्राप्त झाल्या. त्यासंदर्भात संबंधितांकडून खुलासा मागविला होता, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.
--------------
महापालिकेने लॅबसाठी केवळ जागा दिली..
पीपीपी तत्त्वावर ही लॅब सुरू करण्यास क्रिष्णा डायग्नोस्टिक या आरोग्य कंपनीला महापालिकेने जागा दिली आहे. त्यांच्याकडून सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार आरोग्य सेवा दिली जात आहे. येथे गरिबांची टेस्ट मोफत केली जात आहे.
-----------
लॅबचे पुढे काय?
कोरोनाच्या पिक अवरमध्ये या लॅबमध्ये दिवसाला १ ते दीड हजार टेस्ट केल्या जात होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना दिवसाला २०० जणांची टेस्ट केली जात आहे. कंपनीने गुंतवणूक केली आहे, तर अचानक लॅब बंद करता येत नाही. त्याच मशीनवर अन्य चाचण्या केल्या जातात. कॅन्सर मार्करची चाचणी होऊ शकते. अन्य चाचण्याही केल्या जाऊ शकतात. त्यामुळे लॅब सुरूच ठेवून तिथे अन्य चाचण्यांची सुविधा सुरू करता येऊ शकते. याशिवाय कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे लॅबची उपयोगिता अद्याप संपलेली नाही.
...............