महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताय कोरोना चाचणी गरजेचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:39+5:302021-07-07T04:49:39+5:30

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात रेल्वेने जाण्यासाठी आता ७२ ...

Corona test is required from Maharashtra to Karnataka | महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताय कोरोना चाचणी गरजेचीच

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताय कोरोना चाचणी गरजेचीच

googlenewsNext

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात रेल्वेने जाण्यासाठी आता ७२ तास आधी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. रेल्वे गाड्यांचे कन्फर्म तिकीट असले तरी ही चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत नेणे अत्यावश्यक आहे. कर्नाटकाबरोबरच अन्य काही राज्यांतही हाच नियम लागू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत असली तरी काही राज्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी प्रवासासाठी रेल्वे प्रशासन आणि त्या-त्या राज्यांनी नियमावली तयार केली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलचे दरवाजे अजूनही सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंदच आहेत. आता दुसरी लाट ओसरत असल्याने लोकल सर्वांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र, पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी राज्य शासनाने लोकल प्रवासावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. तसेच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बाळगणे बंधनकारक केले आहे. हा अहवाल नसलेल्यांची रेल्वेस्थानकात उतरल्यावर चाचणी केली जात आहे. तसेच स्वतःच्या व सहप्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून अन्य राज्यांत प्रवास करण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

- मुंबईतून उत्तरेकडे तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. त्या राज्यांत जाण्या-येण्यासाठी कोविड चाचणी करणे अत्यावश्यक आहे.

- मेंगलोर, गोवा आदी ठिकाणीही लांबपल्ल्यांच्या गाड्या जात आहेत. तसेच राज्यातही सर्वत्र कमी अधिक प्रमाणात रेल्वे सुरू आहे.

- दिल्लीसाठीही राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली आहे. मात्र, प्रवासासाठी कन्फर्म तिकीट असणे आवश्यक आहे.

---------------

या रेल्वे कधी सुरू होणार?

- तपोवन एक्स्प्रेस

- नांदेड, लातूर मार्गावरील गाड्या

- दिल्लीला जाण्यासाठी राजधानी वगळता अन्य गाड्या

- राज्यराणी, इंद्रायणी, सिंहगड एक्स्प्रेस

- कोयना एक्स्प्रेस

- महालक्ष्मी एक्स्प्रेस

---------------

पॅसेंजर कधी सुरू होणार?

- मुंबई-भुसावळ

- दादर-रत्नागिरी

- दिवा-सावंतवाडी

- एलटीटी-पंढरपूर

- एलटीटी-साईनगर शिर्डी

- पुणे-कुर्डुवाडी

- कुर्डुवाडी-पंढरपूर

- मनमाड-नाशिक-इगतपुरी शटल

----------

कोरोना चाचणी, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

रेल्वेने दुसऱ्या राज्यात जाताना कोरोना चाचणी करावी. त्याचे प्रमाणपत्र आणि लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवावे. जेणेकरून सुरक्षित प्रवास करता येईल. तसेच सहप्रवासीही बिनधास्त प्रवास करू शकतील.

----------------

राज्यात, उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना आरक्षण मिळेना

रेल्वे प्रवासासाठी महिनाभर आधी नियोजन करून तिकिटाचे आरक्षण केल्यास कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता असते. पण नजीकच्या दिवसात राज्यात किंवा परराज्यात प्रवास करायचा असेल तर तिकीट मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिक नियम पाळून, तर कधी न पाळूनही प्रवास करण्याच्या मानसिकतेत असल्याचे निदर्शनास येत आहे.

--------

रेल्वे प्रवाशांनी महाराष्ट्रमधून कर्नाटकात जाताना प्रवासाच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांना प्रवास करता येणार आहे. त्यासंदर्भात तेथील रेल्वे प्रशासनाने २९ जूनला जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रवासाच्या नियम, अटीबाबत जनजागृती केली आहे. येथील माध्यमांद्वारेही त्याबाबत नागरिकांना सूचित केले आहे.

- जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे

---------------

Web Title: Corona test is required from Maharashtra to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.