CoronaVirus News: कोरोना टेस्टिंग लॅब जूनमध्ये होणार सुरू; स्टिंगची क्षमता वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 01:43 AM2020-05-30T01:43:22+5:302020-05-30T06:11:20+5:30
खाजगी रुग्णालयाने कोरोनाच्या रुग्णांकडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरप्रमाणेच उपचाराचे शुल्क घ्यावे.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर २.२ टक्के तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३७ टक्के आहे. कोरोना टेस्टची क्षमता वाढविण्यासाठी नवीन टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार असून, ही लॅब जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा महापौर विनीता राणे यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी आयुक्तांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, ८ एप्रिलपासून महापालिका हद्दीतील एकाही कोरोना रुग्णाला मुंबईत उपचारासाठी पाठविलेले नाही. रुग्णांकडून टेस्ट आणि उपचाराचा खर्च घेतला जात नाही. महात्मा फुले आरोग्य योजनेतून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मेट्रोपोलीस लॅबने महापलिका हद्दीतील १० हजार रुग्णांची कोविड चाचणी मोफत करून देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेची शिफारस आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, खाजगी रुग्णालयाने कोरोनाच्या रुग्णांकडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरप्रमाणेच उपचाराचे शुल्क घ्यावे. त्यासाठी सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये दर पत्रकाचे फलक लावले जातील. एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याआधीच तो संशयित असताना त्याला उपचार नाकारणाºया खाजगी रुग्णालयांच्या विरोधात कारवाई केली जाईल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णाला महापालिकेच्या रुग्णालयात पाठविता येईल. खाजगी रुग्णालयात ताप रुग्ण उपचारासाठी आल्यास रुग्णालयाने त्याचा अहवाल महापालिकेच्या हेल्थ पोस्टला एका दिवसात पाठविणे सक्तीचे करण्यात आले आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डोंबिवली क्रीडासंकुलातील बंदिस्तगृहात २०० बेड्स, सावित्रीबाई फुले कलादालनाच्या जागेत ७०० बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण १२०० बेड्सची व्यवस्था केली जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी निधी देणार आहेत. तिसºया टप्प्यात तीन हजार ४५८ बेड्सची आवश्यकता आहे. परंतु, महापालिकेकडे साडेतीन हजार बेड्सची तयारी आहे.
१०० रुग्णवाहिका उपलब्ध करणार
केडीएमसीकडून १०० रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५० रुग्णवाहिकांची तयारी केली आहे. प्रत्येक प्रभाग क्षेत्रात १० रुग्णवाहिका उपलब्ध होतील. सध्या १५ रुग्णवाहिकांना जीपीएस यंत्रणा बसविली आहे. तसेच मिनीबसचा रुग्णवहिका म्हणून वापर केला जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभाग क्षेत्रात एक याप्रमाणे मिनीबसची रुग्णवाहिका उपलब्ध होईल.
खाजगी रुग्णालयांनी पुढे यावे
एकूण रुग्णांपैकी व्हेंटिलेटरची तीन टक्के व आॅक्सिजनची पाच टक्के गरज भासतेय. नहार व ईश्वर या खाजगी रुग्णालयांनी महापालिकेस कोरोना रुग्णांकरिता उपचार देण्यास तयारी दर्शविली आहे. अन्य खाजगी रुग्णालयांनीही असा पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.