टॅक्सी आणि रिक्षाचालकांना कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:39 AM2021-04-06T04:39:43+5:302021-04-06T04:39:43+5:30
ठाणे : राज्यात आता पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने आता ...
ठाणे : राज्यात आता पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने आता शहरातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांना येत्या १० एप्रिलपर्यंत कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे; परंतु तसे न केल्यास प्रवासास बंदी घातली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
राज्यासह ठाण्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे याचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज होत आहेत. त्यात आता राज्यात मिनी लॉकडाऊन घोषित झाल्याने त्यादृष्टीने वाहतूक विभागानेदेखील आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात आजही शेअर रिक्षांच्या माध्यमातून अधिकचे प्रवासी नेले जात आहेत. वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाई होत असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचेच यातून दिसत आहे, तसेच तोंडाला मास्क न लावण्याचे प्रकार घडत आहेत; परंतु आता शहरातील प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सीचालकाला येत्या १० एप्रिलपर्यंत कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यांनी ही चाचणी करूनच प्रवाशांची वाहतूक करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच चाचणी न करता १० तारखेपर्यंत प्रवाशांची ने-आण करीत असताना रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना मुभा दिली आहे, तर टॅक्सीमध्ये ५० टक्के क्षमतेने प्रवाशांना नेण्याची मुभा देण्यात आली आहे; परंतु हे प्रवासी नेत असताना प्रवासी आणि चालकांमध्ये प्लास्टिकचे कव्हर मधे असणे गरजेचे सांगण्यात आले आहे. या नियमांचे पालन करणे बंधनकारकच असेल, असेही वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे तोंडाला मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई आणखी कठोर केली जाणार आहे.
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी युनियनवाल्यांसोबत चर्चा करण्यात आली असून, जनजागृतीदेखील केली जात असल्याचे सांगण्यात आले.
रिक्षा आणि टॅक्सीचालकांना येत्या १० एप्रिलपर्यंत कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे, तसेच शासनाने जे काही नियम बंधनकारक केले आहेत, त्यांचे पालन या सर्वांनाच करावे लागणार आहे.
(बाळासाहेब पाटील - उपायुक्त, ठाणे वाहतूक पोलीस).