कोरोनाचा वृद्धांपेक्षा तरुणांनाच धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:07 AM2020-05-31T00:07:33+5:302020-05-31T00:07:52+5:30
पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्ण ५० टक्के । ६० वर्षांवरील वयोगटात ८२८ रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये महिला रुग्णांचे प्रमाण हे पुरुष रुग्णांच्या तुलनेत ५० टक्के इतके आहे. तसेच एकूण रुग्णांमध्ये २६ ते ४० या वयोगटांतील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटांतील रुग्णांच्या तुलनेत ६० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण हे ५० टक्के इतके आहे. त्यामुळे कोरोना हा वृद्धांपेक्षा तरुणांकरिता घातक ठरला आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपानाचे प्रमाण अधिक असल्याने पुरुष रुग्णांची संख्या जास्त आहे.
वय वर्षे १ ते २५ आणि ४१ ते ५० या वयोगटांतील रुग्णसंख्येत अवघा १०० रुग्णांचा फरक आहे. ठाणे जिल्ह्यात २९ मे पर्यंत सात हजार ३८७ रुग्ण आढळले. त्यापैकी तीन हजार ५०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तीन हजार ६५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २२३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात नोंद झालेल्या सात हजार ४५ रुग्णांमध्ये चार हजार ६५९ पुरुष रुग्ण आहेत, तर दोन हजार ३८६ स्त्री रुग्ण आहेत. या रुग्णांचे पाच वयोगटांत वर्गीकरण केले आहे. त्यामध्ये १ ते २५ या वयोगटांत एक हजार ५७१ रुग्ण आहेत तर, २६ ते ४० या वयोगटांत सर्वाधिक एक हजार ७८६ रुग्ण आहेत. ४१ ते ५० या वयोगटांमध्ये एक हजार ४९७ रुग्ण आहेत तर, ५१ ते ६० या वयोगटांमध्ये एक हजार ३६३ रुग्ण आढळून आले आहेत. ६० च्या पुढील वयोगटांत ८२८ रुग्णांची नोंद आहे.
पाचही वयोगटांतील रुग्णांमध्ये ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. २६-४० या वयोगटांत ठामपा क्षेत्रात ७४६ रुग्ण आहेत. त्या खालोखाल १ ते २५ या वयोगटांत ६३० रुग्ण असून ६० वर्षांवरील गटात सर्वात कमी २१२ रुग्ण असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे.
६० वर्षांवरील वयोगटांतील रुग्णसंख्येत नवी मुंबई महापालिका ठामपापेक्षा एक रुग्णाने मागे आहे. नवी मुंबईत २११ रुग्ण आढळून आले आहेत. ६० वर्षांवरील सर्वात कमी १२ रुग्ण हे अंबरनाथ येथे आढळले आहेत.
भिवंडीत १४ रुग्ण
भिवंडी : शहरात शनिवारी सात रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला. ग्रामीण भागातही सात नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०९ वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातील एकूण आकडा ९० वर पोहोचला आहे.