कोरोनामुळे गृहिणींचे वाळवणाचे बेत फसले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:33 AM2020-04-27T02:33:10+5:302020-04-27T02:33:19+5:30
. मात्र आता त्यासाठी लागणाऱ्या काही साहित्याचा बाजारात तुटवडा असल्याने महिलांचे हे बेत सुकण्याआधीच फसत आहेत. त्यामुळे महिलांनी कमी साहित्यात बनणारे ठरावीक वाळवणाचे पदार्थ बनवण्यावर भर दिला आहे.
स्नेहा पावसकर
ठाणे : मार्च-एप्रिलचा महिना म्हटला की, घरोघरी गृहिणींची वाळवणाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. यंदा कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे गेल्या महिनाभरापासून गृहिणींसह नोकरदार महिलांनाही हे वाळवणाचे पदार्थ बनवायला चांगली संधी मिळाली आहे. मात्र आता त्यासाठी लागणाऱ्या काही साहित्याचा बाजारात तुटवडा असल्याने महिलांचे हे बेत सुकण्याआधीच फसत आहेत. त्यामुळे महिलांनी कमी साहित्यात बनणारे ठरावीक वाळवणाचे पदार्थ बनवण्यावर भर दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमधील सक्तीच्या सुट्यांमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वच जण घरी आहेत. मार्च-एप्रिल-मे या महिन्यात अनेक घरातील गृहिणी पापड, कुरडया, सांडगे असे वाळवणाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त दिसतात. यंदा कोरोनामुळे घरातून बाहेर पडण्यास बंदी असल्याने मार्चमध्ये महिलांनी हे पदार्थ बनवायला प्राधान्य दिले नाही. आता लॉकडाउन वाढल्यानंतर अनेक महिलांनी हे पदार्थ बनवण्याकडे मोर्चा वळवला आहे.
एरवी नोकरदार महिलांना नोकरीच्या व्यापामुळे यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र यंदा अजूनही लॉकडाउन संपेपर्यंतचा काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तसेच हे वाळवणाचे पदार्थ शेजारी-मैत्रिणींची मदत घेऊन करावे लागतात. आता मात्र कुटुंबातील सर्वच मंडळी घरी असल्याने अनेक घरी ते पदार्थ बनवायला सुरूवात केली
आहे.
बटाटा, तांदूळ, गहू, नाचणी, विविध प्रकारच्या डाळी, रवा, साबुदाणा, पोेहे, तीळ, मसाला, पापडखार असे विविध साहित्य यासाठी आवश्यक असते.
मात्र कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये बाजारातील किरकोळ दुकानदारांकडे आधीच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे, तर घाऊक बाजारात या वस्तू घेण्यासाठी लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत. आणि त्यातही काही आवश्यक साहित्य दुकानांतून उपलब्धच नसल्याने नागरिकांचा व विशेषत: वाळवणाचे बेत आखलेल्या गृहिणींचा हिरमोड होत आहे. त्यामुळे हे पदार्थ कधी बनवणार असा सवाल केला आहे.
>लाकडाउनमुळे आॅफिसला सुटी असल्याने पापड, चकल्या, वेफर्स, कुरडया असे वाळवणाचे पदार्थ बनवायला पुरेसा वेळ हाती होता. तसेच मदतीला घरातीलच इतर सदस्यही हजर होते. मात्र या पदार्थांसाठी लागणाºया साहित्याचा बाजारातील दुकानांतून तुटवडा असल्याने ते पदार्थ योग्यरितीने बनणार नाहीत. परिणामी एखाददुसरा पदार्थच बनवता येईल. - सुरक्षा दळवी, नोकरदार महिला.