ठाणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके काढले, सात दिवसांत ६७ रुग्ण; सक्रिय रुग्णांची संख्या झाली ७९
By अजित मांडके | Published: March 14, 2023 06:08 PM2023-03-14T18:08:56+5:302023-03-14T18:09:03+5:30
देशात एच थ्री एन टू या विषाणूचा शिरकाव झाला असतानाच आता गेल्या वर्षभरापासून हद्दपार असलेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे.
ठाणे : देशात एच थ्री एन टू या विषाणूचा शिरकाव झाला असतानाच आता गेल्या वर्षभरापासून हद्दपार असलेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्याभरात ठाणे जिल्ह्यात तब्बल ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून सक्रीय रुग्णसंख्या ७९ वर पोहचली असल्याची धक्कादायक आकडेवारी हाती आली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील असून दुसरा क्रमांक नवी मुंबईचा लागला आहे. त्यामुळे ठाणेकरांनो सावधान, सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क घाला असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
मार्च २०२० मध्ये ठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. या फेर्याला आता तीन वर्षे पूर्ण होत आहे. या तीन वर्षांमध्ये सुमारे ७ लाख ४७ हजार ५८७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ७ लाख ३६ हजार ३०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी या कोव्हिडने ११ हजार ९६९ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या मधल्या काळात लसीकरणावर जोर दिला गेला असल्याने गेल्या गेल्या १० महिन्यांपासून कोरोनाला हद्दपार करण्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणेला यश आले. पण आता पुन्हा मार्च महिना उजाडताच कोरोनाने एण्ट्री घेतल्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसू लागले आहे.
गेल्या आठवडाभराचा आढावा घेतला असता सात मार्चला जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले होते. मात्र आठवड्याभरात ही दैनंदिन नवीन रुग्णसंख्या आता १९वर पोहचली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये ठाणे महापालिका पुन्हा हिटलिस्टवर आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये येथे ३९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर नवी मुंबईत १२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.