बेचव अन्नाच्या तक्रारींचे खापर कोरोना ‘लक्षणां’च्या माथी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:43 AM2020-07-25T00:43:33+5:302020-07-25T00:43:39+5:30
रुग्णांना सकस, संतुलित आहार
- प्रशांत माने
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील कोरोनाच्या रुग्णांना दिले जात असलेले जेवण बेचव व निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रुग्ण व त्यांचे नातलग करीत आहेत. कोरोनात रुग्णांच्या तोंडाची चव जाणे आणि वास न येणे, यामुळे संबंधित तक्रारी केल्या जात असल्याचे केडीएमसीचे म्हणणे आहे. उलटपक्षी, रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने सकस, संतुलित शाकाहारी आहार दिला जात असून कुणी केलेल्या तक्रारींत तथ्य आढळले, तर भोजन पुरविणाऱ्याला योग्य त्या सूचना दिल्या जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
सध्या कल्याण-डोंबिवलीत सहा हजार ४३३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीयांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. केडीएमसीच्या कोविड आणि क्वारंटाइन सेंटरमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना भोजन, न्याहारी आणि सीलबंद बाटलीतील पाणी पुरविले जात आहे.
भिवंडी येथील टाटा आमंत्रा, शहाड येथील साई निर्वाणा, कल्याणमधील होलीक्रॉस रुग्णालय, डोंबिवलीतील क्रीडासंकुल, शेलारनाका परिसरातील बीएसयूपी क्वारंटाइन सेंटर आणि डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय येथे सकाळी ८ वाजता नाश्ता, दुपारी ११.३० ते १ या कालावधीत भोजन, दुपारी ४ वाजता चहा आणि रात्री ८.३० ला पुन्हा भोजन दिले जाते. परंतु, अन्न बेचव, निकृष्ट असल्याच्या तक्रारी रुग्ण आणि नातेवाइकांकडून होत आहेत. या तक्रारींचे खापर प्रशासनाने कोरोनात उद्भवणाºया लक्षणांवर फोडले आहे. याआधी तक्रारी नव्हत्या. परंतु तोंडाची चव जाणे, वास न येणे, मळमळणे, पोट बिघडणे, अशी लक्षणे आढळून येत असल्याने तक्रारी वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
तेलकट, तिखट वर्ज्य
आरोग्याच्या दृष्टीने शाकाहारी संतुलित आहार दिला जातो. तेलकट, तिखट वर्ज्य केले जाते. त्यात मधुमेह आणि रक्तदाबविकार असलेले रुग्ण असल्याने त्याप्रमाणे आहार द्यावा लागतो. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला आहे. त्यामुळेही तक्रारी होत आहेत. परंतु, ज्या काही तक्रारी होतात, त्या किरकोळ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महापालिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेले भोजनच रुग्णांना दिले जाते, याकडेही प्रशासनाने लक्ष वेधले आहे.