Corona Vaccination: १५ जणांनी घेतली बेकायदेशीर लस; चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 09:56 AM2021-06-03T09:56:44+5:302021-06-03T09:57:01+5:30
दोषी असणाऱ्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस
ठाणे : अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र तयार करून तिला बेकायदेशीरपणे लस दिल्याचे उघड झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अशा प्रकारे २१ श्रीमंत तरुण - तरुणींची बनावट ओळखपत्र तयार करून १५ जणांनी अशा प्रकारे लस घेतल्याची माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचे बनावट ओळखपत्रही तयार केले होते. मात्र, तिला लस दिलेली नाही. यात दोषी असणाऱ्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस अहवालात केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद केले असताना ठाणे महापालिकेने मात्र अभिनेत्री मीरा चोप्राला फ्रंटलाईन वर्कर दाखवून पार्किंग प्लाझा येथे लस दिली होती. विशेष म्हणजे ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा येथे मनुष्यबळ पुरविणाऱ्या ओम साई आरोग्य सेवा या संस्थेने बनावट ओळखपत्र तयार करून तिला सुपरवायझर दाखवून ही लस दिली होती. त्यानंतर तिने स्वतःच सोशल मीडियावर छायाचित्रे टाकून लस घेतल्याचे जाहीर केले होते. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी उपायुक्त (आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून, त्यात अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत.
लसीकरणासाठी २१ श्रीमंत तरुण - तरुणींची बनावट ओळखपत्र तयार केली होती. त्यामध्ये तब्बल १९ जणांना सुपरवायझर, तर दोन जणांना अटेंडंट म्हणून असल्याचे ओळखपत्र दिले होते. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचे ओळखपत्र चौकशी समितीच्या चौकशीमध्ये उघड झाले आहे. परंतु, तिने लस घेतली नसल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे. ज्यांनी लस घेतली आहे त्या सर्वांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी शिफारस केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे आता आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दोषींवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.