Corona vaccination : ठाणे जिल्ह्यातील सुमारे 59 टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 06:53 PM2021-09-23T18:53:45+5:302021-09-23T19:45:04+5:30
Corona vaccination Thane: - ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग देण्यासाठी आज जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या प्रमुख उपस्थित झाली.
ठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग देण्यासाठी आज जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या प्रमुख उपस्थित झाली. लसींचा काटेकोरपणे वापर करतानाच अंथरूणाला खिळलेले रुग्ण, गर्भवती बेघर, भिकारी आणि मनोविकार रुग्ण यांचे लसीकरणाचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी यावेळी आरोग्य यंत्रणेला निर्देश देण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात सुमारे 59 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी श्रीमती रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेंघे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांच्यासह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर येथील महापालिकांचे लसीकरण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. ज्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट वर्कर यांनी दुसरा डोस घेतलेला नाही त्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करून घ्यावे, अंथरूणाला खिळलेले रुग्ण, गर्भवती बेघर, भिकारी आणि मनोविकार रुग्ण यांचे लसीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश यावेळी यंत्रणेला देण्यात आले.
या बैठकीत 26 सप्टेंबर रोजी राबविण्यात येणाऱ्या उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड या तालुक्यांमध्ये आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका व अंबरनाथ नगरपालिका या ठिकाणी ही मोहिम राबविली जाणार आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेत एकूण 1 लाख 74 हजार 419 मुलांना पोलिओ डोस देण्यात येणार असून त्यापैकी ग्रामीण भागातील संख्या 1 लाख 5 हजार 840 तर शहरी भागातील संख्या 68 हजार 519 एवढी आहे. लसीकरण मोहिमेसाठी 1372 बुथ लावले जाणार आहेत, असे डॉ. रेंघे यांनी सांगितले.
कोरोना काळात घेण्यात येणाऱ्या पोलिओ लसीकरण मोहिमेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा प्रभावीपणे वापर करून मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीमती रानडे यांनी यावेळी केले.
याबैठकीत जिल्ह्यात २८ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. सुमारे 4 लाख 4 हजार 232 लाभार्थ्यांना या मोहिमेंतर्गत जंतनाशक गोळी सेवनासाठी देण्यात येणार आहेत.