Corona Vaccination Thane: ठाणे जिल्ह्याने विक्रम केला! 1 कोटी लसीकरणाचा ओलांडला टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 06:39 PM2021-12-09T18:39:08+5:302021-12-09T18:46:30+5:30
Corona Vaccination Thane: आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच लसीकरणाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६० लाख ६१ हजार ६४८ नागरिकांना तर ३९ लाख ७५ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने आज १ कोटी डोसेसचा टप्पा ओलांडला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार ४४ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण डोसेसची संख्या १ कोटी ३६ हजार ६४९ एवढी झाली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करीत लसीकरणाला अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६० लाख ६१ हजार ६४८ नागरिकांना तर ३९ लाख ७५ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याने गेल्या काही दिवसांपासून लसीकरणात आघाडी घेतली दिवसाला सरासरी ५० हजारापर्यंत लसीकरण केले जात आहे. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात दर दिवशी ४५० ते ५०० लसीकरण केंद्र आयोजित करण्यात येत आहेत. मात्र अजुनही लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला सांगितले.
सध्या पहिला डोस न घेतलेल्या लाभार्थींची संख्या ठाणे जिल्ह्यात जास्त आहे मात्र दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही राज्याच्या सरासरीपेक्षा ही अधिक आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची राज्य सरासरी ४७.८४ टक्के असून ठाणे जिल्ह्याची ही सरासरी ५२.१५ टक्के एवढी असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेग अजून वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.