Corona Vaccination: लसीकरण केंद्रासाठी गुरुनानक शाळांची पाहणी; उल्हासनगर कॅम्प नं-४ साठी लसीकरण केंद्राची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 05:09 PM2021-04-30T17:09:08+5:302021-04-30T17:09:29+5:30
उल्हासनगर महापालिकेने शहर पूर्वेतील शाळा क्रं-२९ मध्ये लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र लसीसाठी नागरिक पहाटे ५ वाजल्या पासून रांगा लावत आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर पूर्वेतील महापालिका शाळेत एकमेव लसीकरण केंद्र असून नागरिक लसीसाठी पहाटे ५ वाजता पासून रांगा लावत आहेत. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी व लसीकरण जलद होण्यासाठी कॅम्प नं-४ येथील गुरुनानक शाळा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केला. यावेळी साळवे यांनी लसीकरण केंद्रासाठी गुरुनानक शाळा इमारतीची पाहणी केली.
उल्हासनगर महापालिकेने शहर पूर्वेतील शाळा क्रं-२९ मध्ये लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र लसीसाठी नागरिक पहाटे ५ वाजल्या पासून रांगा लावत आहेत. नागरिकांना लस मिळण्यासाठी व लसीकरण केंद्रावरील नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी काँग्रेसच्या गटनेत्या व प्रभाग क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी शुक्रवारी गुरुनानक शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी शाळेची पाहणी केली. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यास सुरवात होणार असल्याने केंद्रावर लसीसाठी नागरिक एकच गर्दी करणार असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
गुरुनानक शाळा येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी महानगरपालिकेच्या डॉ सुवेदिका सोनावणे, डॉ अर्चना भामरे तसेच गुरुनानक शाळेचे संस्था चालक सुरजित सिंग, मुख्याध्यापिका रीना नायर व सीमा फाफाळे यांच्या सोबत अंजली साळवे यांनी चर्चा करून शाळेची पाहणी केली. मात्र महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे डोळे लागले आहे.