कल्याणच्या कुष्ठरोग वसाहतीत कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:36+5:302021-05-23T04:40:36+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण पूर्व भागातील हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीमधील १३५ कुष्ठरुग्णांचे शनिवारी लसीकरण केले. कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत जाऊन लसीकरण ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण पूर्व भागातील हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीमधील १३५ कुष्ठरुग्णांचे शनिवारी लसीकरण केले. कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत जाऊन लसीकरण करणारी केडीएमसी ही राज्यातील पहिली महापालिका असावी, असा दावा प्रशासनाने केला आहे.
कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी राज्य सरकारने नेमलेले अधिकारी मंगेश खंदारे यांनी माहिती दिली की, कुष्ठरोग पीडितांसाठी सामाजिक काम करणारे गजानन माने आणि कुष्ठरोग वसाहतीचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे कुष्ठरुग्णांच्या लसीकरणाचा प्रस्ताव दिला होता. मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी या प्रस्तावाला आयुक्तांच्या संमतीने मान्यता दिली. त्यानुसार हे लसीकरण करण्यात आले. कुष्ठरोग पीडित रुग्ण हे लसीकरण केंद्रावर जाऊ शकत नाहीत. ते विकलांग असतात. तसेच टोकन घेऊन ते जास्त वेळ रांगेत उभे राहू शकत नाहीत. त्यांच्याकरिता त्यांच्या वसाहतीत जाऊन ही लसीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. राज्यात अन्य ठिकाणच्या कुष्ठरोग वसाहतीतही अशा प्रकारचे लसीकरणाची प्रक्रिया राबविली जावी, अशी अपेक्षा खंदारे यांनी व्यक्त केली.
--------------------