Corona Vaccination : ग्लोबल टेंडरची चिंता मिटली, महापालिका विकत घेणार पाच लाख लस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:04 PM2021-05-19T18:04:16+5:302021-05-19T18:04:56+5:30
Corona Vaccination : ठाणे महापालिका ५ लाख लसींसाठी ५० कोटींचा खर्च करुन ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली.
ठाणे : आर्थिक परिस्थिती नसतानाही महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी केल्याने हा खर्च कसा उभा करणार असा सवाल मागील काही दिवसापासून अशी चर्चा शहरात सुरु होती. भाजपने देखील या खर्चाच्या मुद्यावरुन प्रशासनाला जाब विचारला होता. परंतु आता ग्लोबल टेंडरची चिंता अखेर मिटली असून ठाणे महापालिका ५ लाख लसींसाठी ५० कोटींचा खर्च करुन ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली. (Corona Vaccination: Municipal Corporation to procure 5 lakh vaccines)
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेला ग्लोबल टेंडर काढता येणे शक्य नसल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली होती. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीच शासनाकडून येणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत असल्याने टेंडर काढणो शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु लसींचा तुटवडा लक्षात घेता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले जावे असे स्पष्ट केले होते. त्यानंतर तत्काळ महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले जाणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु महापालिकेने अशी तयारी केली असताना त्यासाठी निधी कसा उभारला जाणार असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावरुन भाजपने देखील शंका उपस्थित केली होती. परंतु आता या सर्वाची उत्तरे बुधवारी झालेल्या महासभेत मिळाली आहेत. तसेच भाजपने उपस्थित केलेल्या शंकेची हवा देखील यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी काढली.
महापालिकेच्या माध्यमातून ५ लाख लसींसाठी टेंडर काढले जाणार असून त्यानुसार एका लसीसाठी १ हजारांचा खर्च अपेक्षित धरला तर साधारणपणो ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा खर्च करण्याची देखील पालिकेची तयारी असून त्यानुसार महासभेत या संदर्भातील आयत्या वेळेचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार यासाठी मुंबईला ज्या पध्दतीन रशियाच्या स्फुटनिक लस पुरविण्याचे सुतोवाच केले आहे, त्यानुसार ठाण्यासाठी देखील त्यांना पाचारण केले जाणार असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले. तर हा खर्च कसा केला जाणार याचे उत्तरही त्यांनी दिले. ग्लोबल टेंडरसाठी येणार खर्च हा कोविडसाठी राखून ठेवण्यात आलेला २०० कोटीतून केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.