ग्रामीण भागांत अद्याप कोरोना लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:39 PM2021-03-11T23:39:51+5:302021-03-11T23:40:02+5:30
वयोवृद्धांत चिंता : कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरू
आरिफ पटेल
मनोर : पालघर पूर्व ग्रामीण भागात कोरोना लसीकरणासाठीची लस अद्याप न पोहोचल्याने वयोवृद्ध व्यक्ती व अन्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून कोणत्याच प्रकारची हालचाल होताना दिसत नाही. तसेच नेते, पुढारीसुद्धा काही हालचाल करताना दिसत नाहीत.
जिल्ह्यात ३४ केंद्रांमधून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून ३५ हजार नागरिकांना लसीची पहिली मात्रा, तर ८ हजारहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा दिली गेली आहे, नगरपरिषद हद्दीत शहरी भागात लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे, मात्र पालघर तालुक्यातील पूर्व जंगलपट्टी भागातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील गावपाड्यांवर अद्याप लस पोहोचलीच नाही. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण लसीकरण देण्यासाठी अजून आरोग्य यंत्रण सज्ज नाही. त्यांना प्रशिक्षण नाही म्हणून ग्रामीण भागात लसीकरणाच्या मोहिमेला विलंब होत आहे का? असे प्रश्नही सध्या नागरिक करताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून लसीकरण सुरू आहे, मात्र ग्रामीण भाग लसीकरणापासून वंचित असून लवकरात लवकर लसीकरणाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
सध्या मनोर परिसरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी खंदारे यांना नियोजन करायला सांगितले आहे. मनोर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. लवकरात लवकर लसीकरणाला सुरुवात करू.
- डॉ. मिलिंद चव्हाण,
सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर