ठाण्यात एकाच दिवशी एकाच केंद्रावर तब्बल दहा हजार जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 02:46 PM2021-10-03T14:46:51+5:302021-10-03T14:49:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिवा प्रभाग समितीमध्ये राबविलेल्या ‘लस महोत्सवा’मध्ये शनिवारी एकाच दिवशी एकाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिवा प्रभाग समितीमध्ये राबविलेल्या ‘लस महोत्सवा’मध्ये शनिवारी एकाच दिवशी एकाच केंद्रावर तब्बल दहा हजार १० व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आहे. देशात प्रथमच एखाद्या केंद्रावर एकाच वेळी इतक्या मोठया संख्येने लसीकरण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. लसीकरणाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे अभिनंदन केले आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर म्हस्के आणि आयुक्त डॉ. शर्मा यांच्या पुढाकाराने हा लस महोत्सव यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यासाठी माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षा सुनिता मुंडे, नगरसेविका दर्शना म्हात्रे, दिपाली भगत, अंकिता पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील आणि दीपक जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
शनिवारी सकाळी ९ वाजता दिव्यातील एसएमजी शाळेच्या आवारात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर म्हस्के आणि आयुक्त डॉ. शर्मा यांच्या हस्ते लस महोत्सवाला सुरु वात झाली. दोन सत्रात झालेल्या महोत्सवामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत एकूण दहा हजार दहा लसीकरण पूर्ण करण्यात आले. या लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती पालिकेने दिली. स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स, नर्सेस, डेटा एन्ट्री आॅपरेटर आणि रुग्ण निरीक्षक यांच्या शिस्तबद्ध नियोजनामध्ये हे लसीकरण पार पडले. एकाच वेळी दहा हजार नागरिकांना लस उपलब्ध केल्याबद्दल दिवावासीयांनीही समाधान व्यक्त करुन महापौर आणि पालिका आयुक्तांचे आभार मानले.