Corona Vaccination: पालघरमधील लसीकरण मोहीम ऑक्सिजनवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:18 AM2021-04-09T00:18:37+5:302021-04-09T00:18:54+5:30

जिल्ह्याच्या भांडारातील लससाठा संपला; आरोग्य विभागाने ८५ हजार नवीन लसींच्या साठ्याची केली मागणी

Corona Vaccination: Vaccination campaign in Palghar on oxygen! | Corona Vaccination: पालघरमधील लसीकरण मोहीम ऑक्सिजनवर!

Corona Vaccination: पालघरमधील लसीकरण मोहीम ऑक्सिजनवर!

googlenewsNext

- हितेन नाईक

पालघर : पालघर जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ऑक्सिजनवर असून डहाणू तालुक्यातील कासा आणि वसई तालुक्यातील निर्मळ येथील लसीकरण केंद्रे लसीचा साठा नसल्याने बंद पडली आहेत. ग्रामीण भागातील केंद्रात ९ हजार २४० तर शहरी भागात ३ हजार १७० इतक्या शेवटच्या लसीचा साठ्यांचे वितरण करण्यात आले असून पालघर पूर्व मधील लसीकरण भांडारातील लस साठा संपला आहे. आरोग्य विभागाने ८५ हजार नवीन लसीच्या साठ्यांची मागणी पुण्याच्या आरोग्य संचालकांकडे केली असली तरी राज्य शासनाकडे लसीचा साठा शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ठप्प पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा स्फोट झाला असून राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचे खुद्द आरोग्य मंत्र्यांनी मान्य केल्याने पालघर जिल्ह्यातून आरोग्य संचालनालय, पुणे येथे ८५ हजार लसीची करण्यात आलेली मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. पालघर जिल्ह्याला कोव्हिशिल्ड लसीचा १ लाख ३४ हजार ७३० चा साठा उपलब्ध झाला असून कोवॅक्सिनचा १० हजार २४० चा साठा प्राप्त झाला होता. जिल्ह्यात शासकीय ५२ तर खाजगी १७ अशा एकूण ६९ केंद्रातून लसीकरण मोहीम सुरू आहे.

पालघर पूर्व वेवूर येथील आरोग्य विभागाच्या लस भांडार केंद्रातील ९ हजार २४० लसी जिल्ह्यातील ग्रामीण भागात, तर ३ हजार १७० लसी शहरी भागातील केंद्रांत वितरित करण्यात आल्या आहेत.

राज्यात चार दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा असल्याचे खुद्द आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केल्याने गुरुवारी पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी काही नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

कालच्या व्हीसीमध्ये उपलब्ध साठा संपवा. रिपोर्टिंगमध्ये झिरो आकडा आला की केंद्राकडून साठा उपलब्ध होणार असल्याने 
८५ हजार लसीची मागणी केली आहे.
- डॉ. दयानंद सूर्यवंशी, 
जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर

लसीकरण केंद्रावर खूप गर्दी असल्याने संख्या कमी होण्याची वाट पाहत असताना आता लसीचा साठा नसल्याने केंद्राने तात्काळ लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा.
    - संतोष चुरी, पालघर

आम्ही लसीकरणाला जाण्याची तयारी करत असताना लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे केंद्राने तात्काळ राज्याकडून करण्यात आलेली लसीची मागणी पूर्ण करावी.
    - आशिष पाटील, 
विकासक, पालघर

Web Title: Corona Vaccination: Vaccination campaign in Palghar on oxygen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.