Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यात लसीकरण प्रमाणात चढउतार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:55 AM2021-04-08T00:55:58+5:302021-04-08T00:56:10+5:30
लॉकडाऊनचा जाणवतोय परिणाम : काेराेनाला राेखण्यासाठी लस घेणे आवश्यक
- अजित मांडके
ठाणे : राज्यात मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने त्याचे परिणाम आता ठाणे जिल्ह्यातही दिसू लागले आहेत. ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांत लसीकरणाचेदेखील चढउतार दिसू लागले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता नागरिक लसीकरणासाठी बाहेर पडत असले तरी त्यांच्या मनात कारवाईची भीतीदेखील आहे. असे असले तरी कोरोनाला रोखायचे असेल तर लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून ते लसीकरणासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. मागील सात दिवसांत जिल्ह्यात लसीकरणाचे त्यामुळे काही प्रमाणात चढउतार पाहावयास मिळाले आहेत.
राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर आता त्याचा परिणाम लसीकरणावर होईल, असे दिसत होते. मात्र, ठाणे जिल्ह्यात तसे फार प्रमाणात दिसून आलेले नाही. मार्चच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसांत लसीकरण अगदी कमी झाले होते. मात्र, एप्रिल महिना सुरू होताच, पुन्हा त्याला वेग आल्याचे दिसून आले आहे. एप्रिलमध्ये लसीकरण वाढले असले तरी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर ते कमी झाले आहे. त्यातही ५ एप्रिलला तब्बल २९ हजार १२९ जणांनी लसीकरण केले होते. परंतु, ६ एप्रिलला १४ हजार २९८ जणांनीच लसीकरण केल्याचे दिसून आले. लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख ७७ हजार ४३७ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये पहिला डोस पाच लाख ५ हजार १९३ जणांना देण्यात आला आहे, तर दुसरा डोस ७२ हजार २४४ जणांनी घेतला आहे. हेल्थ वर्कर असलेल्या ८३ हजार ५९३ जणांनी पहिला आणि ४२ हजार ७०४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रन्टलाईन वर्करमधील ६२ हजार ४५९ जणांनी पहिला आणि २५ हजार ६२९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याशिवाय ४५ वर्षे वयोगटापुढील एक लाख २२ हजार ३२९ जणांना पहिला आणि ९४५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर ६० वर्षांपुढील दोन लाख ३६ हजार ८१२ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला आणि दोन हजार ९६६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.आता मिनी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर नागरिकांमध्ये थोडीशी भीती दिसून येत आहे.
कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरण गरजेचे असल्याचे सांगून नागरिकदेखील लसीकरणासाठी पुढे येताना दिसत आहेत. त्यामुळे लसीकरणाला वेग आला आहे.
मिनी लॉकडाऊन घोषित झाल्याने लसीकरणाला जावे किंवा नाही, अशी भीती आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनात आहे. जाताना काही कारवाई झाली तर काय करावे, असा प्रश्न मनाला सतावत आहे.
- मारुती ताजवे, ज्येष्ठ नागरिक
कोरोनाला हरवायचे आहे, त्यामुळे लस तर घ्यायची आहेच. परंतु, लॉकडाऊन असल्याने लसीकरणाला कसे जावे, अशी भीती मनात घर करून आहे. परंतु, तरीदेखील मी लस घ्यायला जाणार आहे.
- राकेश कोलप, नागरिक
लॉकडाऊन झाल्याने लसीकरणाला जावे किंवा नाही जावे, याबाबत मनात संभ्रमावस्था आहे. कारवाई झाली तर पुन्हा लसीकरण महागात पडण्याची शक्यता आहे. - अशोक म्हस्कर, नागरिक
मिनी लॉकडाऊनचा फारसा परिणाम लसीकरणावर झालेला नाही. लसीकरणासाठी नागरिक पुढे येत आहेत. मात्र, काही प्रमाणात संख्या कमी झाली असली तरी वेग मंदावलेला नाही.
-कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालय