'त्या' डॉक्टराला कोरोना लस नाकारली अन् महापौरांच्या लसीवरुन राजकारण तापले, भाजपाची पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:41 PM2021-02-26T12:41:24+5:302021-02-26T12:42:07+5:30
BJP's poster campaign against mayor : कोरोनायोद्ध्यांना लस देणे गरजेचे असताना महापौरांचे लाड कशासाठी असा थेट सवाल भाजपाने या पोस्टरद्वारे उपस्थित केला आहे.
ठाणे : एकीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या कोरोना लसीवरुन आता राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाने आता याचे भांडवल करीत शहरभर पोस्टरबाजीतून महापौरांवर सडकून टीका केली आहे. कोरोनायोद्ध्यांना लस देणे गरजेचे असताना महापौरांचे लाड कशासाठी असा थेट सवाल भाजपाने या पोस्टरद्वारे उपस्थित केला आहे. दुसरीकडे, एक डॉक्टर महापालिकेत लस मिळावी म्हणून आले होते. परंतु आता तुमची मुदत संपल्याचे सांगत त्यांना पिटाळून लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे लसीचे राजकारण आता पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Corona vaccine denied to doctor, BJP's poster campaign against mayor)
कोरोना आपत्तीच्या काळात झोकून देत कार्य न करता ठाणोकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून स्वत: कोरोना लस घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली कोरोना लस म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप भाजपने केला आहे. लस पूर्णपणे सुरक्षित आहे हे सर्वाना समजण्याकरिता लस घेतली असल्याचा महापौरांचा दावा आहे. मात्र, याबाबत सरकारी आदेश दाखिवणार का, असा सवालही भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना पत्र पाठवून ठाण्यामध्ये झालेल्या गैरप्रकाराकडे लक्ष वेधले. तसेच ठाणे शहराला पुरवठा करण्यात आलेली लस सत्तेचा गैरवापर करून कोणाला दिली आहे का, नक्की किती फ्रंटलाईन वर्कर्सना लस मिळाली, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु भाजपाची मंडळी एवढय़ावरच थांबली नसून त्यांनी आता ठाण्यात पोस्टरबाजी करुन महापौरांवर हल्लाबोल केला आहे.
महापौरांवर हल्लाबोल करणारे पोस्टर महापालिका मुख्यालयासमोरच लावण्यात आल्याने अनेकांच्या नजरा या पोस्टरवर जात आहेत. कोरोना योद्धे ठाण्याचा अभिमान त्यांना सर्वप्रथम लस मिळणे हा त्यांचा अधिकार, सेना आमदार, महापौरांनी लायनीत घूसून त्यांचा केला अपमान अशा आशयाचे पोस्टर सध्या सर्वाचे लक्ष वेधले आहे. शिवसेना राष्ट्रवादी भाऊ भाऊ दोघे मिळून जनतेच्या पैशावर मजा मारु असा आशयही पोस्टर झळकत आहे. एकूणच भाजपाने पोस्टरबाजीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीला देखील आपले लक्ष केल्याचे दिसत आहे.
पालिकेने डॉक्टरला पिटाळून लावले
दोन दिवसापूर्वी ठाण्यातील एक डॉक्टर लस मिळावी म्हणून महापालिका मुख्यालयात गेले होते. त्यांनी आरोग्य विभागाच्या संबधींत अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्याला कोरोनाची लस हवी असल्याचे सांगत नोंदणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. परंतु आता तुम्हाला लस घेता येणार नसल्याचे उत्तर त्यांना देण्यात आले. दीड महिन्यापूर्वीच नोंदणी मोहीम संपल्याचे त्यांना सांगण्यात येऊन तेथून पिटाळून लावण्यात आले. एकीकडे सत्तेच्या जोरावर लस घेणाऱ्यांसाठी पालिकेकडे लस उपलब्ध आहेत. मात्र जे प्रामाणिकपणे जीवाची पर्वा न करता कोरोना काळात रुग्णांची सेवा केली अशांसाठी मात्र पालिकेकडे लस नाही, या पेक्षा दुसरे दुर्देव ते काय अशी टीका देखील आता पालिकेवर होऊ लागली आहे.