Corona Vaccine : लसीच्या तुटवड्याने मीरा भाईंदरमध्ये दिला जात आहे फक्त दुसरा डोस; नागरिकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 06:03 PM2021-04-09T18:03:04+5:302021-04-09T18:05:24+5:30
Corona Vaccine In Mira Bhayander : शासनाकडून मीरा भाईंदर महापालिकेला १ लाख ६ हजार ६२० लसीं देण्यात आल्या होत्या. लसीकरणासाठी पालिकेने स्वतःची ११ लसीकरण केंद्र सुरु केली होती.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेकडे गुरुवारी रात्रीपर्यंत कोविशील्डच्या केवळ ३३४० इतक्याच लस शिल्लक असल्याने शुक्रवारी पालिकेने दुसरा डोस असणाऱ्या केवळ ५०० जणांनाच लस दिली. लस नसल्याने पालिकेने ६ लसीकरण केंद्र तात्पुरती बंद केली असून केवळ ५ केंद्रच सुरू ठेवली आहेत. लस नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला तर काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले.
शासनाकडून मीरा भाईंदर महापालिकेला १ लाख ६ हजार ६२० लसीं देण्यात आल्या होत्या. लसीकरणासाठी पालिकेने स्वतःची ११ लसीकरण केंद्र सुरु केली होती. तर खाजगी ९ लसीकरण केंद्र आहेत. पालिकेने जास्तीजास्त नागरिकांना कोरोनाची लस लवकर मिळावी म्हणून रोजच्या ३ ते साडे तीन हजार लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून देखील रोज सुमारे ५ हजार लोकांना लस दिली जात होती.
गुरुवार रात्रीपर्यंत महापालिकेकडे केवळ ३३४० लसच शिल्लक राहिल्या. शासनाकडून लस येणे तूर्तास अवघड असल्याने पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चर्चा करून शुक्रवार पासून मीरारोड, विनायक नगर, मुर्धा, पेणकर पाडा, नवघर व उत्तन केंद्रातील लसीकरण तापुरते बंद केले.
शुक्रवारपासून भीमसेन जोशी रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, मीनाताई ठाकरे सभागृह, बंदरवाडी आरोग्य केंद्र व काशीगाव आरोग्य केंद्र ह्या ५ ठिकाणीच लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. नव्याने लस देणे बंद केले असून ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अश्या लोकांनाच दुसरा डोस दिला जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर फक्त १०० लोकांनाच लस दिली जात आहे. म्हणजेच लस चा साठा येत नाही तो पर्यंत रोज एकूण ५०० लोकांनाच लस दिली जाणार आहे.
जेणे करून आज लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्र बंद झाल्याचे तर ज्या ५ ठिकाणी केंद्र सुरु होते तेथे केवळ दुसऱ्या डोस ची लस दिली जाणार असल्याचे समजल्यावर संताप व्यक्त होत होता. काठी ठिकाणी हुज्जत घातली जात होती. लस नसल्याने अनेक लोक रिकाम्या हाताने परत गेले. केवळ १०० लोकांनाच लस द्यायची असल्याने दुपारनंतर लसीकरण केंद्रावर शुकशुकाट होता.
पंतप्रधान म्हणाले की, लसीकरण उत्सव साजरा करायचा. पण आम्हाला लस मिळणारच नसेल तर हा कसला उत्सव असा संताप काहींनी व्यक्त केला. तर केंद्र व राज्य शासनाच्या राजकीय वादातून सामान्य नागरिक मात्र लसीकरण अभावी जीव गमावण्यास कारणीभूत ठरल्याचा रोष काहींनी व्यक्त केला.
डॉ . अंजली पाटील (लसीकरण अधिकारी , महापालिका) - शासनाकडून लसीचा पुरवठा सुरू होताच पुन्हा सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाईल. सध्या ५ केंद्रात लसीकरण सुरू आहे. तेथे रोज दुसरा डोस बाकी असणाऱ्या प्रत्येकी १०० जणांना लस दिली जात आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. ऑनलाईन नोंदणी करावी. केंद्रात सर्व सुविधा व आवश्यक कर्मचारी तैनात आहेत.