Corona Vaccination: ठाण्यातील लसीकरण केंद्रांवर गोंधळ; शेकडो लोक रांगेत फक्त ५० लोकांनाच लस मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:40 AM2021-04-27T11:40:57+5:302021-04-27T11:42:16+5:30
Corona Vaccination in Thane: वाडिया आरोग्य केंद्रावर ४० डोस उपलब्ध आहेत. दुसरीकडे ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील असाच गोंधळ उडाला असून नागरिकांनी सुरक्षा रक्षकांना चांगलेच भंडावून सोडले आहे. त्यांना समजाविताना सुरक्षा रक्षकांची पुरती त्रेधा उडालेली आहे.
- विशाल हळदे
ठाणे : १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना लस (corona Vaccine) देण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, त्या आधी काही दिवस ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनाच लस मिळत नसल्याने लसीकरण मोहिमेचा पुरता फज्जा उडालेला आहे. देशभरासह राज्यात ठिकठिकाणी कोरोना लसीचा मोठा तुटवडा असल्याने अनेकांना तासंतास रांगेत थांबूनदेखील लस न घेताच माघारी जावे लागत आहे. ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील लसीकरण केंद्रात आज मोठा गोंधळ पहायला मिळाला. (Corona Vaccination Shortage in Thane's Tembhi Naka Vaccination Center.)
लसीकरण केंद्रात फक्त ५० डोस आहेत आणि पहाटे ५ वाजल्यापासून ५०० हून अधिक लोक रांगेत उभे आहेत. यापैकी ३० जणांना लसीकरणाचे टोकन देण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातील आणखी २० जणांना ही लस दिली जाणार आहे. यामुळे रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांसोबत वाद घातला. कोव्हॅक्सिन उपलब्ध नसल्याने अनेकांना आता माघारी जावे लागणार आहे. ठाणे महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक 12 मध्ये हा गोंधळ उडाला आहे. या शाळेतून टोकन घेऊन वाडियामध्ये लस घेण्यासाठी जावे लागते.
वाडिया आरोग्य केंद्रावर ४० डोस उपलब्ध आहेत. दुसरीकडे ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील असाच गोंधळ उडाला असून नागरिकांनी सुरक्षा रक्षकांना चांगलेच भंडावून सोडले आहे. त्यांना समजाविताना सुरक्षा रक्षकांची पुरती त्रेधा उडालेली आहे.