जिल्ह्यात 11 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:25 PM2021-02-26T23:25:40+5:302021-02-26T23:25:56+5:30
लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू : ४४ केंद्रांवर प्रशासनाचे नियोजन
सुरेश लोखंडे
ठाणे : कोरोना या जागतिक महामारीतून बचाव करण्यासाठी आरोग्ययंत्रणेसह पोलीस आणि प्रशासनाच्या या फ्रन्टलाइन वर्कर पाठोपाठ आता ज्येष्ठ नागरिकांनाही एक मार्चपासून कोरोना लसी देण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्ह्यातील तब्बल ११ लाख ४०८ ज्येष्ठ नागरिकांना ४४ लसीकरण केंद्रांवर ही लस देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी व त्याविरोधात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने राज्यभरात ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ या दोन प्रकारच्या लसींना मान्यता दिली आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ या लसीचा डोस जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे फ्रन्टिअर अधिकारी, कर्मचाऱ्यांपाठोपाठ प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि तिसऱ्या टप्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या नियंत्रणात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांकडून या लसीकरणाचे काम सुरू आहे.
तिसऱ्या टप्प्यातील या लसीकरणापाठोपाठ आता ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील तब्बल ११ लाख ४०८ ज्येष्ठांना या लसीकरणाचा लाभ देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील सहा महापालिकांसह दोन नगर परिषदा आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील ग्रामीण भागातील २९ केंद्र आदी ४४ लसीकरण केंद्रांवरच या ज्येष्ठ नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ देण्याचे नियोजन हाती घेतले जात आहे.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या अध्याप प्राप्त झालेली नाही. महसूल विभागाकडून प्राप्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येनुसार लसीकरण करण्यात येईल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठांना स्वत: लसीकरण केंद्रांवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर काही वेळेतच त्यांचे लसीकरण होईल. याप्रमाणोच राज्य शासनाच्या प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करण्याचे नियोजन जिल्ह्यात करण्यात येईल.
- डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी