Corona Virus: होळीच्या रंगांवर कोरोनाचे सावट; विक्री ८० टक्क्यांनी घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 12:02 AM2020-03-09T00:02:40+5:302020-03-09T00:03:16+5:30
Holi 2020: विनारंगांची होळी खेळण्याचा अनेकांचा निर्धार
प्रज्ञा म्हात्रे। / जितेंद्र कालेकर
ठाणे : रंगपंचमी अवघ्या एका दिवसावर आली असली, तरी बाजारपेठेत रंगांच्या खरेदीत शुकशुकाटच आहे. देशभरात कोरोनाची भीती असल्याने त्याचा परिणाम रंगपंचमीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवार असूनही रंगांची खरेदी झालेली नसून ही खरेदी ८० ते ९० टक्क्यांनी घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
भारतातही कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले असून भीतीपोटी अनेक जण मास्क लावून फिरत आहे. अवघ्या एका दिवसावर आलेल्या रंगपंचमीवरही कोरोनाचे सावट दिसून येत आहे. यंदा रंगपंचमी न खेळण्याचा निर्णय काही ग्रुप्सनी घेतला आहे. ठाण्याच्या बाजारपेठेत ठिकठिकाणी रंग आणि पिचकाऱ्यांचे लहानमोठे स्टॉल्स लागले असले तरी, फक्त १० टक्केच खरेदी होत असल्याचे चंदा गुप्ता यांनी सांगितले. लोक चीनचे रंग आणि पिचकाऱ्यांकडेही दुर्लक्ष करीत आहेत. कोरोनाची भीती असल्याने ९० टक्के रंगांचे मार्केट थंडावले आहे.
आम्ही यंदा कोणतीही रिस्क न घेता रंग विक्रीसाठी आणले नाही. यंदा रंगांची रंगपंचमीदेखील खेळली जाणार नाही, असे दिसत असल्याचे समीर विध्वंस यांनी सांगितले. आम्ही चीनहून पिचकाºया आणलेल्या नाही, असेही छोट्या विक्रेत्यांनी सांगितले. सध्या बाजारात लहान मुलांच्या हट्टापायी पिचकाºयांची खरेदी होत असली तरी, रंग मात्र खरेदी करताना फारसे कुणीही दिसत नाही. विक्रीसाठी नैसर्गिक रंग असल्याचा दावा विक्रेते करीत असले, तरी त्याचीही खरेदी होत नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. मी एका फेरीत तीन हजारांचा माल विक्रीसाठी आणला होता, परंतु अर्ध्या मालाचीही विक्री झालेली नाही. दरवर्षी पाच दिवसांअगोदर रंगांची खरेदी होते. परंतु, एका दिवसावर रंगपंचमी असूनही कोरोनामुळे रंगांची खरेदी झालेली नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
कोरोनामुळे काही ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असून यंदाची शोभायात्रा होणार की नाही, असा प्रश्न ठाणेकरांमध्ये आहे. याबद्दल श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे विश्वस्त प्रा. विद्याधर वालावलकर यांना विचारले असता त्यांनी अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या परिस्थितीवर आम्हीही लक्ष ठेवून आहोत.
चिनी रंगांवर बहिष्काराचे आवाहन
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणेनगर पोलिसांनी ठाण्यातील मुख्य बाजारपेठांमधील रंग व्यापाºयांना नोटिसा पाठवून नैसर्गिक रंग विक्रीसाठी ठेवण्याचे आवाहन करताना, चायनीज आणि रासायनिक रंग टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. होळी, धूळवड आणि शिवजयंतीच्या अनुषंगाने ठाणेनगर पोलिसांनी शांतता समितीची नुकतीच बैठक घेऊन जनतेला सावधानतेबाबत सूचना दिल्या आहेत. ठाणेनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी यासंदर्भात सामान्य लोकांनी कोणत्या खबरदाºया घ्याव्यात, याबाबत मार्गदर्शन केले. चिनी मालावर बहिष्कार टाकून रसायनमिश्रित रंग वापरू नयेत. कोरोना व्हायरस हा बराच काळ जिवंत राहत असल्याने या वस्तूंमधून त्याची बाधा होण्याची शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणावरही रंग उडवू नका व जातीय सलोखा सर्वानीच पाळला पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले.
पिचकाºयांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ
डोंबिवली : बच्चेकंपनीत पिचकारीचे मोठे आकर्षण असते. यंदा कोरोनाच्या भीतीमुळे चायनीज पिचकारी विक्रीसाठी आलेल्या नाहीत, त्यामुळे भारतीय बनावटीच्या पिचकाºयांना मागणी वाढली आहे. त्यामुळे पिचकारीच्या किमतीत २० टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. २० ते ६५० रुपयांपर्यंत पिचकारीची किंमत आहे. पर्यावरणस्नेही रंगात पाच रंग उपलब्ध आहेत. त्यांची किंमत १०० रुपयांपासून आहेत; पण यंदा फारसा व्यवसाय होईल, असे दिसत नाही, अशी माहिती विक्रेते हितेश जैन यांनी दिली.
रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकणाºयांवर कारवाई
होळी आणि धुळवडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरुणींवर किंवा अल्पवयीन मुलींवर पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकणाºयांवर कडक कारवाई केली जाणार आहे. शिवाय, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. या सणासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा अवलंब करण्याचे पर्यावरणपे्रमींकडून तसेच सामाजिक संस्थांकडून आवाहन केले जात आहे.
होळी-धुळवडीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाण्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. धिंगाणा घालणारे, प्लास्टिकच्या पिशव्या फेकणाºयांवर दामिनी पथकाची करडी नजर राहणार आहे. तसेच ‘कोरोना’ व्हायरसमुळे शक्यतो नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहनही केले आहे. - बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर
दुसरीकडे होळी आणि धुळवडीच्या आधीच काही मुले अनोळखी मुला-मुलींच्या दिशेने पाण्याने किंवा रंगाने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या भिरकावत आहेत. यातूनच छेडछाडीचे तसेच संबंधित मुले किंवा मुली जखमी होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे रंगाच्या पिशव्या भिरकावणाºयांविरुद्ध तक्रार आल्यास ती पोलिसांकडून गांभीर्याने घेतली जाणार आहे.
छेडछाड करणाºयांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांचे दामिनी पथक तत्काळ कारवाई करणार आहे. पाचही परिमंडळांमध्ये पोलीस मुख्यालयाचे ७०० कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या आणि स्थानिक तीन हजार कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोना व्हायरसमुळे गर्दी टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.