Corona virus: उल्हासनगरात आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 04:22 PM2020-03-14T16:22:49+5:302020-03-14T17:20:12+5:30
उल्हासनगर उद्योगिक शहर असल्याने व्यवसायाच्या निमित्त अनेक जण परदेशीवाऱ्या करीत आहेत.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : दुबई वरून आलेल्या एका रुग्णाला कोरोनाचे लक्षणे आढळले आहे. त्याच्यावर शुक्रवारी रात्री प्राथमिक उपचार करून मुंबई येथील कस्तुरबा रूग्णालयात उपचारासाठी पाठविल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. याप्रकाराने शहरात खळबळ उडाली असून त्याच्या संपर्कात आलेल्यांची व कुटुंबाची तपासणी व उपचार महापालिकेचे पथक करीत आहे.
उल्हासनगर उद्योगिक शहर असल्याने व्यवसायाच्या निमित्त अनेक जण परदेशीवाऱ्या करीत आहेत. व्यवसाया निमित्त गेलेल्या एका सिंधी नागरीक 9 मार्चला उल्हासनगरात परतला. त्याला 12 मार्चला ताप आल्याने त्याने खाजगी रुग्णालय गाठले. मात्र तेथील डॉक्टरांनी शासकीय जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान सदर रुग्ण उपचारासाठी आला.
मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांना कोरोना व्हायरसचे लक्षणे त्याच्यात आढळल्याने, त्यांनी प्राथमिक उपचार करून मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्वरित पाठविले. अशी माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. तसेच याबाबत महापालिकेला माहिती दिली असून त्याच्या संपर्कातील व कुटुंबाची तपासणी करण्याचे सुचविल्याचे डॉ शिंदे म्हणाले.
शहरात संशयित कोरोनाचा रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली असून महापालिका आयुक्तांनी नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले. तसेच 45 जिम, 6 चित्रपटगृह व तरण तलाव बंद करण्यात आले आहे. संशयित कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व कुटुंबाची पालिका वैद्यकीय पथक तपासणी करून उपचार देत आहेत. कस्तुरबा रुग्णालयातून तपासणी झाल्यानंतरच खरा प्रकार उघड होणार असल्याचे मत डॉ शिंदे यांनी व्यक्त केले.