Corona virus news: धक्कादायक! ठाणे महापालिका आयुक्तांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:17 PM2021-03-31T12:17:28+5:302021-03-31T12:33:05+5:30
ठाणे शहरात कोरोनाची वाढती रुग्ण असताना प्रभावी उपाययोजना करणारे आणि प्रत्यक्षात फील्ड वर उतरून काम करणारे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हेही कोरोनामुळे बाधित झाले आहेत. शर्मा यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून काम केले होते. मात्र आता तेच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :ठाणे शहरात कोरोनाची वाढती रुग्ण असताना प्रभावी उपाययोजना करणारे आणि प्रत्यक्षात फील्ड वर उतरून काम करणारे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हेही कोरोनामुळे बाधित झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ.शर्मा हे देखील यातून सुटलेले नाही. गुरुवारी एका महत्वाच्या बैठकीसाठी डॉ. शर्मा हे मुंबईला गेले होते.त्यानंतर त्यांना शुक्रवारी त्रास झाल्यामुळे त्यांनी शनिवारी कोरोनाची तपासणी केली. त्यांचा हा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
डॉ. शर्मा यांनी पहिल्या लाटेमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करून ठाण्यात कोरोना नियंत्रणात आणला होता.प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी काम केले होते.यावेळी देखील शर्मा यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून काम केले होते. मात्र आता तेच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.