corona virus: वर्धापनदिनाचा सोहळा टाळून जागृती पालक संस्थेत विद्यार्थ्यांना वाटले मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 04:11 PM2020-03-14T16:11:13+5:302020-03-14T16:11:53+5:30
जगभरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातही या आजाराचे संशयित रुग्ण सापडत आहेत.
ठाणे- विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या जागृती पालक संस्थेचा आज १८ व्या वर्धापनाच्या निमित्ताने रिदम हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र 'कोरोना' आजाराच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करून संस्थेतील विद्यार्थ्यांना मास्क वाटून स्तुत्य उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी संस्थेतील विद्यार्थ्यांना व पालकांना स्वच्छतेचे व 'कोरोना' आजाराच्या अनुषंगाने घेता येणाऱ्या काळजीचे धडे दिले.
जगभरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातही या आजाराचे संशयित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ठाण्यातील जागृती पालक संस्थेने त्यांचा १८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने होणारा रिदम कार्यक्रम तूर्तास रद्द केला. या कार्यक्रमाला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, प्रा. प्रदीप ढवळ उपस्थित राहणार होते.
'कोरोना'चे सावट दूर झाल्यानंतर कार्यक्रम पुन्हा करण्याचे संस्थेने ठरवले आहे. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मास्कचे वाटप सामाजिक कार्यकर्ते सुनील दळवी यांच्या माध्यमातून वाटण्यात आले. यावेळी डॉ. क्षेमेंद्र बुडजडे यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक स्वच्छतेचे धडे दिले. तसेच 'कोरोना'ला घाबरून न जाता पाल्यांची आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जागृती पालक संस्थेचे अध्यक्ष सतीश धुरत, सचिव रहीम मुलाणी आदी उपस्थित होते.