Corona Virus: उपनगरीय रेल्वे प्रवासी म्हणतात, कोरोना से क्या डरना?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:10 AM2020-03-13T00:10:12+5:302020-03-13T00:10:37+5:30
बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा आदी शहरी भागांतील प्रवासी हे लोकल प्रवासात कोणी शिंकले, तर त्याला रुमाल धरण्याचा, डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देत आहेत.
अनिकेत घमंडी
डोंबिवली : सर्वत्र कोरोना व्हायरसची चर्चा आणि भीतीचे वातावरण असताना, उपनगरीय रेल्वे प्रवासी मात्र तुलनेने बिनधास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना से क्या डरना, अशाच काहीशा भूमिकेत प्रवासी आहेत. ज्या प्रवाशांना सर्दीचा त्रास आहे, ते स्वत:हून रुमाल बांधून प्रवास करताना दिसले.
बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा आदी शहरी भागांतील प्रवासी हे लोकल प्रवासात कोणी शिंकले, तर त्याला रुमाल धरण्याचा, डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देत आहेत. त्या तुलनेने कर्जत, कसारा, आसनगाव, खडवली आदी ग्रामीण भागांतील प्रवासी रुमाल बांधून प्रवास करत आहेत. प्रवाशांच्या मते जोपर्यंत नोकरीला जावे लागणार आहे, तोपर्यंत प्रवाशांना गर्दीचा सामना करण्याशिवाय पर्याय नाही. काही प्रमाणात आयटी सेक्टर वगळता सर्वत्र कामावर येण्याची सक्ती आहेच. त्यामुळे राज्य शासनाने ही गर्दी कमी करण्यासाठी विचार करणे जास्त गरजेचे असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे सांगणे कितपत सयुक्तिक आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवाशांमध्ये या आजाराबाबत जास्त धास्ती आहे. पुणे येथून येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवासी रुमाल बांधून प्रवास करत होते. नेहमीच्या तुलनेने प्रगती एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी कमी होती. - प्रभाकर गंगावणे, कर्जत
लोकलचा प्रवासी सतर्क आहे, पण घाबरलेला नाही. गर्दी टाळणे शक्यच नाही, या मानसिकतेतून तो प्रवास करत आहे. त्यातही एखाद्याला सर्दी, खोकला असेल तर, सहप्रवासीच रुमाल बांधण्याचा सल्ला देत आहेत. - मंदार अभ्यंकर, डोंबिवली
महिला प्रवासी प्रवासादरम्यान जनजागृती करीत आहेत. सहप्रवाशांना बरं वाटत नसेल तर वैद्यांचा सल्ला घेण्याचे ते सांगत आहेत. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याची माहितीही त्या देत आहेत. महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिला सदस्यांनी लोकल डब्यांमध्ये यासंदर्भात जनजागृती केली. रेल्वे प्रशासनास स्थानकातील स्वच्छतेस प्राधान्य देण्यास सांगितले आहे.
- वंदना सोनावणे, सदस्य, झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी
कोरोनामुळे लोकलची गर्दी कमी झालेली नाही. तसेही इथल्या नागरिकांना सर्दी, खोकला असे त्रास सुरूच असतात. त्यामुळे कोरोना व्हायरसने फार काही तणाव, भीती असं काही झालेले नाही. - हर्षा चव्हाण, कल्याण
या आजाराविषयी खूप संभ्रम दिसून येत आहे. निश्चित कारण, निदान, चिकित्सा यांच्या माहितीचा अभाव आहे. याबाबत चर्चा करून अवास्तव भीती पसरवली जात आहे. स्वच्छता, जनजागृती ही त्यासाठी प्रभावी माध्यमे आहेत. - गंधार कुलकर्णी