CoronaVirus: ‘कोरोना’बाधा टाळण्यासाठी गावकरी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:55 PM2020-04-23T23:55:52+5:302020-04-23T23:55:58+5:30
गावाच्या प्रवेशद्वारावर पहारा; सातपाटी गावात कोरोनाबाधिताने प्रवेश करू नये म्हणून रात्रंदिवस काळजी
पालघर : कोरोनाच्या संसर्गाचा वाढता प्रभाव रोखता यावा यासाठी जिल्ह्यातील अनेक गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची पाळी जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. परंतु जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे असलेल्या सातपाटी गावात एकही कोरोनाबाधित रुग्णाने प्रवेश करू नये, यासाठी ग्रामपंचायतीसह शिवछत्रपती शैक्षणिक व क्रीडा मंडळाचे शिलेदार दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून प्रवेशद्वारावर राखण करीत आहेत.
जिल्ह्यात २५ मार्चपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार ८ तालुक्यातील ५५३ देखरेखीखाली असलेले प्रवासी, १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले १३१ प्रवासी, लक्षणे आढळलेले २० प्रवासी या सर्वातून फक्त एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. महिन्याभराच्या कालावधीत या संख्येत मोठी वाढ झाली असून देखरेखीखाली रुग्णांची संख्या ३ हजार ०४१ आली आहे. १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले १०३६ प्रवासी, लक्षणे आढळलेले २९ प्रवासी व त्याच्या सहवासात आलेले २ हजार ३०१ प्रवासींमधून ११६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती. या सर्व रुग्णांमधून आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मनाई आदेश जारी करूनही लोकं आपली वाहने घेऊन अत्यावश्यक खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर येत असल्याने पोलिसांनी ३६२ गुन्हे दाखल करून ३ हजार ३८४ वाहने जप्त केली होती.
सातपाटी हे मासेमारीचे मोठे केंद्र असून ६ हजार ५०० कुटुंबातून सुमारे ३० हजार लोक गावात राहात आहेत. मासे खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ गावात भरत असल्याने परिसरातून मासे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदीदार गावात येत होते.
बाहेरून आलेल्या प्रवाशांमधून एखादा कोरोनाबाधित रुग्ण गावातील लोकांच्या सहवासात आल्यास या विषाणूंचा प्रादुर्भाव गावात वाढून त्याची मोठी किंमत गावाला व परिसराला भोगावी लागू शकते याचा विचार करून सातपाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अरविंद पाटील, उपसरपंच वैभव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश मेहेर आदींसह गावात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाºया शिवछत्रपती शैक्षणिक, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष किरण पागधरे, महेश मेहेर, आनंद म्हात्रे, आनंद गोवारी, बिपीन धनू, गजा देव, चेतन नाईक आदींनी गावाच्या सीमेवरच एक प्रवेशद्वार बनविले आहे.
तरुणांनी घेतली जबाबदारी : सातपाटी पोलिसांचेही सहकार्य
२३ मार्चला लॉकडाउन घोषित झाल्यानंतर गावातून नेपाळ, दार्जिलिंग, दुबई तसेच व्यवसायासाठी उत्तन, वसई येथून गावात आलेल्या सुमारे २०० लोकांच्या नावांची यादी व प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तपासणीचे काम शिवछत्रपती मंडळाच्या सदस्यांनी सुरू केले. तसेच प्रत्येक घरातील वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती यांची नोंद ठेवत त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याची जबाबदारीही या तरुणांनी घेतली.
अत्यावश्यक सेवेत कामाला जाणाºया कामगारांची नोंद ठेवणे, ते आल्यावर पुन्हा नोंद करून सॅनिटायझरद्वारे त्यांचे निर्जंतुकीकरण करणे, बाहेरून येणाºया वाहनधारकांना शहानिशा केल्याशिवाय प्रवेश न देणे आदी काम सुरू आहे. यात सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि जितेंद्र ठाकूर व टीमचे सहकार्य त्यांना मिळत आहे. आतापर्यंत एक साधा संशयित रुग्णही आढळून आलेला नसल्याचे सरपंच पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.