'कोरोनामुळे दिवाळे निघाले, आम्हाला हवी नुकसानभरपाई", जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रांचा खच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 01:21 PM2022-06-09T13:21:12+5:302022-06-09T13:21:27+5:30
एवढेच नव्हे, नुकसान भरपाई दिली नाही तर तुम्हाला न्यायालयात खेचू, असे इशारेही या मागणीपत्रात देण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्रांची फाईल ही जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय झाली आहे.
- अजित मांडके
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे व्यवसाय बुडाले. कित्येकांना नुकसान सहन करावे लागले. आता कोरोना असला तरी सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे आम्हाला मागील दोन वर्षात झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी ठाणे जिल्ह्यातील अनेक दुकानदार, व्यापारी व संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्याचा पाठपुरावाही केला जात आहे. एवढेच नव्हे, नुकसान भरपाई दिली नाही तर तुम्हाला न्यायालयात खेचू, असे इशारेही या मागणीपत्रात देण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्रांची फाईल ही जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय झाली आहे.
शिवाय, या पत्र घोळातून मार्ग कसा काढायचा, या पेचात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी सापडले आहेत. अडीच वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आली. यावेळी कोरोनाची दाहकता लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जवळजवळ सहा महिने सर्वच व्यवहार ठप्प होते. त्याचा फटका अनेकांना बसला. नोकऱ्या गेल्या, संसार उद्ध्वस्त झाले. काहींचे नव्याने सुरू केलेले उद्योगही कोलमडले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत कोरोनाची दाहकता कमी झाल्याचे लक्षात आल्याने सर्व व्यवहारही सुरळीत झाले आहेत.
दरम्यान, सरकारने कोरोनामुळे जीव गमावलेल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. विधवा, लहान मुले असलेल्यांच्या परिवारांसाठीही मदत देऊ केली. असाच मदतीचा सरकारकडून मिळावा, या हेतूने गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रे येऊ लागली आहेत. कोरोनाच्या काळात तुम्ही केलेल्या लॉकडाऊनमुळे माझ्या व्यवसायाला फटका बसला. दोन वर्षात माझे नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. ते भरून निघावे आणि त्यावर १८ टक्के व्याज मिळावे, अशा आशयाची पत्रे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय ठरली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने ही पत्रे स्वीकारली आणि ती पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे पाठवू. त्यांच्याकडून उत्तर आल्यावर तुम्हाला कळवू, अशा उत्तरांनी तुर्तास तक्रारदार पत्रकर्त्यांची समजूत काढली जात आहे.