ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाग्रस्ताला गमवावा लागला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:17 AM2020-09-25T00:17:01+5:302020-09-25T00:17:13+5:30
मनसेने केला आरोप : संबंधितांच्या चौकशीची केली मागणी, आयुक्तांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे भिवंडी येथे राहणाऱ्या वासुदेव पाल यांना जीव गमवावा लागला असल्याचा आरोप करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधितांची चौकशी होऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाल यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांत येणे अपेक्षित असताना तब्बल तीन दिवसांनी म्हणजेच ९ सप्टेंबरला त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आला. या रुग्णाला बाकीचेदेखील आजार होते. त्यांच्या नातेवाइकांनी महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही बाळकुम येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. अखेर, १३ सप्टेंबरला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आणले आणि १२ तासांत हा रुग्ण दगावला, असे मनसेने या निवेदनात म्हटले
आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या सासºयाचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांचे जावई अखिलेश पाल पाचंगे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मृत व्यक्तीस वेळीच उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. यासंदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे आणि मनसे या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहे.
- संदीप पाचंगे,
ठाणे जिल्हाध्यक्ष मनविसे
सासºयांना कोविड हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड मिळावा, यासाठी संबंधित अधिकाºयांना विनवण्या करीत होतो. कळवा हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये नसतानाही त्यांना पाच दिवस तेथे दाखल केले होते आणि सहाव्या दिवशी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. हे वेळीच झाले असते तर आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला नसता.
- अखिलेश पाल, मृताचे नातेवाईक
या प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेतला जाईल.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे मनपा