ठाणेकरांनो, महापालिकेवर भरवसा नाय का?; पैसे देऊन उपचार घेण्याकडे कोरोनाबाधितांचा कल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 01:15 AM2021-03-25T01:15:11+5:302021-03-25T01:26:42+5:30
दोन रुग्णालयांमधील बेड फुल्ल, खाजगी रुग्णालये दिवसाला ४,५०० पासून ते १० हजार रुपये भाडे आकारत आहेत. असे असतानाही ते देण्याची तयारीही रुग्णांची दिसत आहे.
अजित मांडके
ठाणे : ठामपा हद्दीत सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असून, खाजगी रुग्णालयांत भरती होता यावे, यासाठी कोरोनाबाधितांचा हट्ट सुरू झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयांतील बेड सध्या भरलेले आहेत. तर, मनपाच्या कोविड सेंटरमध्ये आजही बेड काही प्रमाणात रिक्त आहेत. २,६२९ बेडपैकी १,१२७ रिकामे असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. यामध्ये आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेडही काही प्रमाणात आजही शिल्लक आहेत. परंतु, असे असताना पैसे मोजून खाजगी रुग्णालयांत उपचार करून घेण्याकडे कल काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
ठामपा हद्दीत कोरोना रुग्णवाढीचा दर हा अचानकपणे १५ टक्क्यांवर गेला आहे. सध्या ५,०१८ जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील ५० टक्के रुग्ण हे घरी उपचार घेत आहेत. आतापर्यंत मनपा हद्दीत ७० हजार २१७ रुग्ण आढळले असून, त्यातील ६३ हजार २८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, १,४३० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीत २,६२९ बेड असून त्यातील १,५०२ बेड फुल्ल, तर १,१२७ बेड रिकामे आहेत. परंतु, असे असले तरी पैसे देऊन बेड मिळविण्यासाठी कोरोनाबाधितांचा अधिक कल असल्याचे दिसत आहे. महापालिकेने सध्या १५ खाजगी रुग्णालये भाड्याने घेतली आहेत. त्यातील केवळ दोन रुग्णालयांत बेड मिळविण्याकडे रुग्णांचा अधिक कल आहे. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांत सध्या बेड शिल्लक नाहीत. त्यातही शासकीय रुग्णालयांत योग्य प्रमाणात उपचार मिळतील की नाही, याबाबतही नागरिक साशंक असल्याने त्यांचा खाजगी रुग्णालयांकडे कल असल्याचे दिसत आहे.
त्यातही, खाजगी रुग्णालये दिवसाला ४,५०० पासून ते १० हजार रुपये भाडे आकारत आहेत. असे असतानाही ते देण्याची तयारीही रुग्णांची दिसत आहे. काही जण तर चांगले उपचार मिळावेत म्हणून मेडिक्लेमची पॉलिसी काढल्याचे सांगत असून खाजगी रुग्णालयांतच उपचार घेण्यासाठी हट्ट धरत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने पालिका आणि जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लाॅकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरु आहे.
राखीव खाटा नावालाच
शहरातील १५ खाजगी रुग्णालयांत सध्या ९५४ बेड असून त्यातील २५४ बेड फुल्ल असून ७०० बेड शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु, शहरातील दोनच खाजगी रुग्णालयांना रुग्णांची पसंती असल्याने उर्वरित १३ रुग्णालयांतील बेड काही प्रमाणात रिकामे असल्याचे दिसून आले आहे.