कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २८ हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:39 AM2021-03-10T04:39:41+5:302021-03-10T04:39:41+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत पुन्हा कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका हद्दीत पुन्हा २८ हॉटस्पॉट तयार झालेले आहेत. यात डोंबिवली शहर ...

Corona's 28 hotspots in Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २८ हॉटस्पॉट

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २८ हॉटस्पॉट

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत पुन्हा कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका हद्दीत पुन्हा २८ हॉटस्पॉट तयार झालेले आहेत. यात डोंबिवली शहर आघाडीवर आहे. यामुळे सुशिक्षितांच्या डोंबिवलीत कोरोनाचे नियम पाळले जात नाही का, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. डोंबिवलीतून मुंबई उपनगरात नोकरीच्या निमित्ताने मुंबईला जास्त प्रमाणात प्रवास केला जातो. तर कल्याण जंक्शन असलेल्या रेल्वेस्थानकातून लाखो लोक प्रवास करीत आहेत. रेल्वेसह अन्यही बरीच कारणे कोरोनावाढीस जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा कहर होता. त्यावेळी महापालिका हद्दीत सुरुवातीला १० हॉटस्पॉट होते. त्यानंतर हा आकडा ३२ वर पोहचला. हॉटस्पॉट असलेल्या प्रभागात कडक निर्बंध लादले होते. आताच्या २८ हॉटस्पॉटमध्ये डोंबिवलीतील जयहिंद कॉलनी, गणेशनगर गरिबाचा वाडा, गावदेवी मंदिर, संतोषी माता मंदिर, देवी चौक, शास्त्रीनगर, भागशाळा मैदान, रामनगर, म्हात्रेनगर, खंबाळपाडा, सावरकर रोड, एकतानगर, देसलेपाडा, एमआयडीसी, ठाकूरवाडी, राजूनगर, आनंदवाडी, पाथर्ली या परिसराचा तर कल्याणमध्ये वायलेनगर, खडकपाडा, गंधारी, रामबाग, श्रीकॉम्प्लेक्स, शास्त्रीनगर, चिंचपाडा, तिसगाव या परिसराचा समावेश आहे. टिटवाळा मांडा परिसरातही रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्या वाढली आहे.

मागच्या वर्षी कोरोनाचा कहर झाला तेव्हा महापालिका हद्दीत आरोग्याच्या सेवासुविधा अपुऱ्या होत्या. त्यानंतर आरोग्याचा जंबो सेटअप उभारून कोविड केअर सेंटरपासून रुग्णालये सुरू करून टेस्टिंग सेंटर वाढविली आहेत. ॲन्टिजेन व आरटीपीसीआर या दोन्ही टेस्टची सुविधा केली असून कोरोना लसीकरणही सुरू आहे. या सगळ्या सोयीसुविधांमुळे नागरिकांमध्ये कोरोनाचे भय राहिले नसून त्यांच्यात बेफिकीरीपणा दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी केली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागू शकतात. प्रसंगी राज्यासह महापालिकेत पुन्हा एकदा दहा दिवसांचा कडक स्वरूपाचा लॉकडाऊन लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

-----------------------------------

Web Title: Corona's 28 hotspots in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.