अखेर ठाण्यातील पोलिसांवर होणार आता कोरोनाचे कॅशलेस उपचार
By जितेंद्र कालेकर | Published: May 7, 2020 12:51 AM2020-05-07T00:51:19+5:302020-05-07T01:10:03+5:30
कोविड रुग्णालयांचा महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश नसल्यामुळे ठाण्यासह राज्यभरातील कोरोनाग्रस्त पोलिसांना लाखोंची बिले भरावी लागत होती. या संदर्भातील सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची आता राज्य शासनाने दखल घेतली असून ठाण्यातील होरायझन आणि सफायर या दोन कोविड रुग्णालयांसह राज्यभरातील अशा अनेक रुग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश केल्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांवर कॅशलेस उपचार होणार आहेत.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो: ठाणे शहरातील वेदांत या रु ग्णालयासह आता कळव्यातील सफायर आणि घोडबंदर रोडवरील होरायझन या कोविड रु ग्णालयांचाही समावेश राज्य शासनाने पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये केला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांवर या रुग्णालयातही अगदी कॅशलेस उपचार होणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. या आजाराचा या योजनेमध्ये समावेश झाल्यामुळे ठाण्यासह राज्यातील पोलिसांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाण्यासह राज्यातील अनेक कोरोनावर उपचार करणाऱ्या खासगी रु ग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत राज्य शासनाने समावेश केलेला नव्हता. त्यामुळे कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराशी लढा दिल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या अनेक पोलिसांच्या हातात लाखोंची बिले येत असल्याचे सविस्तर वृत्त ‘कोरोनाग्रस्त पोलिसांच्या उपचाराची लाखोंची बिले, पोलीस कुटूंब आरोग्य योजना: कोविड रुग्णालयांचा समावेशच नाही’, या मथळयाखाली ‘लोकमत’च्या २ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. राज्य शासनाने कोविड रुग्णालयांचाही पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली होती. जागतिक महामारी असलेल्या कोरोना संसर्गापासून जगाला संरक्षण देणा-या आरोग्य तसेच पोलीस सेवेतील देवदूतांचे सध्या एका बाजूला कौतुक होत असतांना दुसरीकडे ठाण्यासह राज्यभरात अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यात ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ५ अधिकारी आणि २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईतही कोरोनाची लागण झाल्यामुळे तीन पोलिसांचा मृत्यु झाला. दरम्यान, ठाण्यात कळवा येथील सफायर या खासगी रु ग्णालयातून अलिकडेच कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी परतलेल्या पोलीस कर्मचा-याला एक लाखांचे बिल भरावे लागले. त्याच्यासह अन्यही अनेकांना अशाच बिलांचा भरणा करावा लागला. यात मेडिक्लेमही लागू नसल्याचे या पोलिसांना सांगण्यात आले. दरम्यान, राज्य शासनाने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली असून कोरोना या आजाराचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश केला आहे. तसेच ‘सफायर’ आणि ‘होरायझन’ या दोन कोविड रु ग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश करण्याच्या ठाणे शहर पोलिसांच्या प्रस्तावालाही हिरवा कंदिल दिला आहे. राज्यातील अशा अनेक खासगी रु ग्णालयाच्या मागणीलाही गृहविभागासह आरोग्य मंत्रालयाने सहमती दर्शविली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या विरोधात दिवस रात्र आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणा-या पोलिसांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात कल्याण डोंबिवलीतील आर. आर. आणि न्यूऑन या रुग्णालयांचा देखिल समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्शील असणाºया पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यावर मात्र लाखोंच्या बिलांचा भरणा करावा लागत होता. हे खरे आहे. पण आता ठाण्यातील सफायर आणि होरायझन या कोविड रु ग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत शासनाने समावेश केला आहे. त्यामुळे आधी ज्यांनी बिले भरली त्यांनाही बिले सादर केल्यावर त्याची भरपाई मिळेल. शिवाय, यापुढेही पोलिसांना कॅशलेस सुविधा मिळणार आहे.’’
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर