बाप्पांच्या भक्तीपुढे कोरोनाची धास्ती झाली कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:03 AM2020-08-22T00:03:41+5:302020-08-22T00:03:54+5:30
तरी गणरायाच्या पूजाअर्चा, नैवेद्य यासाठी लागणाऱ्या सामानांची खरेदी करण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले होते.
ठाणे : गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. मात्र, शुक्रवारी सकाळपासून ठाणे मार्केटमध्ये खरेदीसाठी झालेल्या गर्दीने सायंकाळपर्यंत उच्चांक गाठला होता. बाप्पांच्या आगमनाच्या तयारीसाठीचा त्यांचा उत्साह पाहता गणरायाच्या भक्तीने कोरोनानामक धास्तीला मागे टाकलेले दिसले. बहुतांश ठाणेकर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असले, तरी गणरायाच्या पूजाअर्चा, नैवेद्य यासाठी लागणाऱ्या सामानांची खरेदी करण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले होते.
कोरोनामुळे कोणताही सणउत्सव किंवा गर्दी जमेल, असे कार्यक्रम करायला परवानगी नाही किंवा ते मोजक्या माणसांमध्येच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तेच नियम यंदा गणेशोत्सवासाठीही लागू होणार आहेत. कोरोनामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला. त्याऐवजी वेगवेगळे आरोग्यविषयक उपक्रम होणार आहेत. तरी, घरोघरी मात्र साधेपणाने का होईना गणरायाची पूजाअर्चा केली जाणार आहे. सजावट नसली तरी गणरायाप्रति असलेल्या भक्तीमुळे आगमनात, पूजाअर्चेमध्ये किंवा त्याच्या पाहुणचारात कमी राहू नये, यासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळते आहे. गणरायाच्या आगमनानिमित्त असणारा त्यांचा उत्साह कमी झालेला नाही.
ठाणे मार्केटमध्ये सर्व दुकानेही सुरू झालेली असून बाप्पांच्या पूजेचे सामान, नैवेद्य, सजावटीचे साहित्य, भाजी-फळे-फुले इ. साहित्याची ठाणेकरांनी खरेदी केली. गेले काही दिवस लपूनछपून धंदा लावणाºया फेरीवाल्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटली होती. भाजीमंडईतही कोरोनापूर्वी जशी गर्दी असायची, तशीच गर्दी दिसत होती. कपड्यांच्या दुकानांतून दरवर्षीच्या तुलनेत गर्दी कमी असली, तरी लहान मुलांच्या हौसेसाठी पालक कपडे खरेदी करताना दिसले.
।पावसातही केली खरेदी
सकाळपासून ठाण्यात पाऊस सुरू होता. तरीही, लोकांची खरेदी सुरू होती. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली आणि उरलीसुरली खरेदी करायला ठाणेकर घराबाहेर पडले. कोरोनामुळे सर्वच ग्राहकांनी आणि विक्रेत्यांनी मास्क लावलेले होते. परंतु, बहुतांश सगळ्यांचे मास्क हे गळ्यात लटकलेले दिसत होते. गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले होते.