ठाण्यात वाडीया रुग्णालयात सुरु होणार कोरोनाचे मोफत चाचणी केंद्र सर्वसामान्यांना मिळणार मोफत चाचणीची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:20 PM2020-04-17T17:20:10+5:302020-04-17T17:21:03+5:30
ठाण्यासह आसपास नागरीकांना आता ठाण्यातच कोरोनाची मोफत चाचणीची सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ठाण्यातील वाडीया रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठाणे : कोरोनाचा प्रार्दुभाव ठाण्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. शहरात १०० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. परंतु ठाण्यात रुग्णांचे किंवा संशयितांचे अहवाल येण्यास पाच ते १२ दिवसांचा कालावधी जात होता. शासकीय यंत्रणांकडून घेतलेले स्वॅब मुंबईला पाठविले जात होते. तर शहरात खाजगी लॅबच्या माध्यमातून चाचणीसाठी ४५०० रुपये आकारले जात होते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा खर्च परवडणारा नसल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. अखेर या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाने वाडीया रुग्णालयात ही टेस्टींग लॅब सुरु करण्याचे निश्चित केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ही सुविधा सुरु होणार आहे.
ठाण्यात आजच्या घडीला १०० हून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. शेकडो जणांना सध्या क्वॉरन्टाइन करुन ठेवण्यात आले आहे. यातील अनेकांच्या चाचण्या पालिका किंवा जिल्हा यंत्रणांकडून करण्यात आल्या आहेत. परंतु अनेकांच्या चाचणी अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. दुसरीकडे अनेकांना होम क्वॉरन्टाइन करण्यात आले असून त्यांच्याची चाचण्या घेण्यात आल्या आहेत. परंतु अहवाल येण्यास विलंब होत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय आणि पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने अनेकांनी भितीपोटीही कोरोनाची चाचणी करुन घेण्यासाठी मागणी केली असल्याची माहिती पालिकेने दिली. दुसरीकडे शहरात दोन खाजगी लॅबला परवानगी देण्यात आली आहे. परंतु एका चाचणीसाठी ४५०० रुपये आकारले जात आहेत. त्यात पहिली टेस्ट निगेटीव्ह आली तर दुसरी टेस्ट करण्यासाठी सर्वसामान्यांकडे पैसे असतीलच असे नाही. त्यामुळे ही देखील एक समस्या पुढे आली आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या डोळ्यासमोर ठेवून येथे शासकीय यंत्रणेची स्वतंत्र लॅब असावी अशी मागणी केली जात आहे. जेणे करुन सर्वसामान्यांना त्याचा लाभ होऊ या आजारावर मात करण्यासही मदत होईल असे मानले जात आहे. या संदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. तसेच अनेकांनी ही सेवा सुरु करण्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यानंतर आता पालिकेच्या माध्यमातून वाडीया रुग्णालयात ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. यासाठी आवश्यक असणारी पीसीआर मशीनही उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आता ही सेवा येत्या दोन ते तीन दिवसात सुरु केली जाणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यामुळे याचा फायदा आता सर्वसामान्यांना अधिक प्रमाणात होऊन याचे रिपोर्टही २४ तासाच्या आत देण्यासाठी प्रशासन कटीबध्द असणार आहे. एकूणच यामुळे आता सर्वसामान्य नागरीकांना आता या सेवेचा लाभ घेता येणार आहे.