ठाणे महापालिकेच्या वाडिया रुग्णालयातून कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 09:58 PM2021-05-18T21:58:30+5:302021-05-19T00:24:48+5:30
कोरोना रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाºया रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या (वागळे इस्टेट) पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अफसर तेजपाल मंगवाना या वॉर्ड बॉयला ताब्यात घेतले आहे. कहर म्हणजे दोन मृत पावलेल्या व्यक्तींचेही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट येथील कर्मचाºयाने दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोना रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाºया रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या (वागळे इस्टेट) पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अफसर तेजपाल मंगवाना या वॉर्ड बॉयला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
अवघ्या १२०० रुपयांमध्ये ठाणे महापालिकेच्या टेंभी नाका येथील वाडीया रुग्णालयात कोरोना रु ग्णांचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे तसेच असाच एक बनावट आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट देतांना मंगवाना याला या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.
* खाजगी चाचणी केंद्रातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देण्याच्या घटनेनंतर असेच बनावट रिपोर्ट तयार करुन देणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती ठाण्यातील एका समाजसेवकास मिळाली होती. त्याची खातरजमा करीत या समाजसेवकाने कोरोनाचे आधी पॉझिटिव्ह असलेले काही रिपोर्टचे नंतर बनावट निगेटिव्ह रिपोर्ट वाडिया रुग्णालयातून मिळविले. कहर म्हणजे दोन मृत पावलेल्या व्यक्तींचेही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट येथील कर्मचाºयाने दिले. याशिवाय, चार हयात असलेल्या व्यक्तींचेही रिपोर्ट याच रुग्णालयातून मिळवले. त्यानंतर हा प्रकार गुन्हे अन्वेषण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. स्वॅब न घेताच हे रिपोर्ट दिले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीमध्ये नेमकी यातील आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे स्पष्ट होईल, असेही तपास अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.