कोरोनाचे रुग्ण वाढल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:38 AM2021-03-24T04:38:26+5:302021-03-24T04:38:26+5:30
अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा प्रादुभाव कमी झाल्याने कुठेतरी एसटीची सेवा सावरण्याचा प्रयत्न सुरू होता. ...
अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचा प्रादुभाव कमी झाल्याने कुठेतरी एसटीची सेवा सावरण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु, ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने त्याचा फटका एसटीला बसला आहे. त्यामुळे उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहेच, शिवाय प्रवासी संख्या घटल्याने एसटीच्या काही मार्गांवर धावणा:या बसेचे प्रमाणदेखील कमी केले आहे. यामुळे एसटीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी पुन्हा खाली आले आहे.
गेल्या वर्षी कोरोना सुरू झाल्यापासून त्याचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळालाच बसला होता. कोरोनापूर्वी ठाण्यातून राज्यासह इतर काही महत्त्वाच्या राज्यात जाणाऱ्या बसमधून महिन्याला सुमारे ६८ ते ७० लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत होते. परंतु, कोरोना आल्यानंतर त्यात घट झाल्याचे दिसून आले. मार्च महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंत एसटी महामंडळाला ३५ ते ४० लाखांचेच उत्पन्न मिळत होते. तसेच महिनाकाठी असलेली प्रवाशांची संख्या खील ३० ते ५० टक्क्यापर्यंत खाली आल्याचे दिसले.
एसटीच्या ठाणे जिल्ह्याअंतर्गत ४२ मार्गांवर रोज बस धावत आहेत. परंतु, कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात यातील १० ते १५ मार्गच सुरू होते. त्यानंतर ऑगस्टपासून यातील जवळ जवळ सर्वच मार्ग सुरू केले. परंतु, आता फेब्रुवारीअखेरपासून जिल्ह्यात कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. तसेच पुण्यातही तो वाढत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम एसटीचे मार्ग कमी करण्यावर झाला आहे. त्यात मागील वर्षी ऑगस्टपासून एसटी सावरण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळेस काही प्रमाणात प्रवासीसंख्यादेखील वाढली होती. तसेच उत्पन्नातही वाढ झाली होती. परंतु, गेल्या २० दिवसांत एसटीचे चाक पुन्हा पंक्चर झाले आहे. प्रवासी संख्या महिनाकाठी आता २५ लाखांपर्यंत खाली आली आहे, तर उत्पन्न ३५ ते ४० लाखांचेच मिळत आहे. त्यातही राज्यात ज्या भागात लॉकडाऊन केला होता त्याठिकाणी बस सोडणे बंद केले आहे.
पुणे मार्गावर निम्या बस
पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसची संख्या आता निम्यावर आली आहे. एका बसमधून १० ते १५ प्रवासी जात असल्याने आणि काही वेळेस बसच रिकाम्या धावत असल्याने येथील मार्गावरील बस निम्यावर आणल्या आहेत.
लॉकडाऊनच्या ठिकाणचे बसचे मार्ग बंद
नाशिक, नागपूर, विदर्भ, धुळे आदींसह अन्य काही ठिकाणी लॉकडाऊन घेण्यात येत असल्याने या मार्गांवरील बस तूर्तास बंद केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
मास्क आहेत मात्र फिजिकल डिस्टन्सिंग नाही
येथील खोपट एसटी डेपोमध्ये पाहणी केली असता, त्याठिकाणी मास्क वापरण्यांचे प्रमाण बऱ्यापैकी दिसून आले. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन कुठेही होताना दिसले नाही.
एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या (महिनाकाठी)
३८ लाख
लॉकडाऊन खुला झाल्यानंतरची संख्या
३० लाख
एसटीने सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या
२५ लाखांच्या आसपास