कोरोनाच्या खबरदारीचे नियम लोकल, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:17+5:302021-03-09T04:43:17+5:30

अनिकेत घमंडी : लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : सर्वसामान्य प्रवाशांसाठी १ फेब्रुवारीपासून उपनगरी लोकल सुरू झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर ...

Corona's precautionary rules on the dhaba in a local, express train | कोरोनाच्या खबरदारीचे नियम लोकल, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये धाब्यावर

कोरोनाच्या खबरदारीचे नियम लोकल, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये धाब्यावर

Next

अनिकेत घमंडी :

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : सर्वसामान्य प्रवाशांसाठी १ फेब्रुवारीपासून उपनगरी लोकल सुरू झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे स्थानके, लोकलमधील वाढती गर्दी यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोऱ्या वाजत आहे. लोकल व एक्स्प्रेस ट्रेनमध्ये मास्कचा वापर बंधनकारक असतानाही अनेकांचा मास्क हनुवटीलाच असल्याचे पाहायला मिळते.

लॉकडाऊन काळापासून मुंबईतून उत्तर आणि दक्षिण भारतात एक्स्प्रेस ट्रेन धावत आहेत. त्यातील बहुतांशी गाड्या कल्याण, ठाणे रेल्वे स्थानकात थांबतात. गाड्यांचे आरक्षित डबे सॅनिटाइज्ड केलेले असतात. परंतु, सॅनिटायझरचा प्रभाव हा फार काळ टिकत नाही. प्रवासीही सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत बेफिकीर असल्याचे आढळून येते. स्वच्छतागृहही काटेकोर स्वच्छ होत नसल्याने तेथेूनही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी प्रवाशांनी सतर्कता बाळगून प्रवास करणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी यंत्रणेने नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, परंतु रेल्वे यंत्रणांमध्येही काहीसा ढिसाळपणा आल्याने प्रवासात कोणत्याही नियमांची पायमल्ली होत आहे.

लोकलमधील गर्दी कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनही हैराण झाले आहे. वाढती गर्दी कमी करण्यासाठी सरकारी व खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. मात्र, त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होऊ शकलेले नाही.

फलाट तिकीट केले पाच पट

मुंबईहून उत्तर व दक्षिण भारतात जाणाऱ्या तसेच कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या बहुतांश एक्स्प्रेस गाड्या ठाणे जिल्ह्यातून जात आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण आदी स्थानकांत लोकलबरोबर एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिन्स, दादर याबरोबरच ठाणे, कल्याण, भिवंडी रोड अशा सात स्थनाकांतील फलाट तिकीट १० रुपयांवरून पाच पटीने वाढवून ५० रुपये केले आहे.

---------

ब्लॅँकेट, चादरी सुविधा बंद

कोरोनामुळे खबरदारी म्हणून रेल्वेने पॅण्ट्रीकार अर्थात खानपान सेवा बंद ठेवली आहे. तसेच रात्रीच्या प्रवासात वातानुकूलित डब्यात दिले जाणारे ब्लॅँकेट, चादरी सुविधादेखील बंद आहेत.

---------

कोरोनामुळे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात कुठेही ब्लँकेट, चादरी दिल्या जात नाहीत. डब्यात सातत्याने सॅनिटायझर फवारले जाते. स्वच्छता ठेवली जाते, तसेच प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळूनच प्रवास करण्यास मुभा दिली जात आहे. आरक्षित तिकिटाव्यतिरिक्त अन्य प्रवासी प्रवास करत नाहीत ना, याची काळजी घेतली जाते.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

-//-//----

रेल्वे स्थानकात ‘नो मास्क, नो एन्ट्री’ या नियमांची अंमलबजवणी केली जाते, जे प्रवासी ऐकत नाहीत, त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था कारवाई करते. त्यालाही सहकार्य केले जाते. त्यानंतर रेल्वे डब्यात जर प्रवासी मास्क काढत असतील तर त्याची माहिती नाही.

- सतीश पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस, डोंबिवली

Web Title: Corona's precautionary rules on the dhaba in a local, express train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.