नव्या आयुक्तांकडून कोरोनाचा आढावा, बंद न पाळणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 02:29 AM2020-03-21T02:29:59+5:302020-03-21T02:30:13+5:30
सिंघल पदभार स्वीकारणार असल्याचे निश्चित नसल्याने प्रसारमाध्यमांनादेखील याचा अंदाज नव्हता. मात्र, ते सकाळी लवकर ९.३० च्या दरम्यानच ठाणे महापालिकेत पोहोचले.
ठाणे : ठाणे महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त विजय सिंघल यांनी शुक्रवारी सकाळी ९.३० वा. ठाणे पदभार स्वीकारून सर्वप्रथम ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाविषयी काय उपाययोजना केल्या आहेत, याचा आढाव घेतला. विशेष म्हणजे, पुढील तीन दिवस दुकाने बंद न करणाऱ्यांवर आणि कॉल सेंटरमध्ये ५० टक्के हजेरी न लावणाºयांवर वेळ पडल्यास कारवाई करा, असे आदेश देतानाच ठाणे महापालिकेतही ५० टक्केच हजेरी लावा, असे त्यांनी खडसावून सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर केवळ दोन तास ते आपल्या कार्यालयात बसून काही मोजक्या अधिकाºयांची बैठक घेऊन मुख्यालयातून निघून गेले.
सिंघल पदभार स्वीकारणार असल्याचे निश्चित नसल्याने प्रसारमाध्यमांनादेखील याचा अंदाज नव्हता. मात्र, ते सकाळी लवकर ९.३० च्या दरम्यानच ठाणे महापालिकेत पोहोचले. या वेळी मुख्यालयात महत्त्वाचे अधिकारीच होते. त्यानंतर त्यांनी अधिकाºयांची एक छोटी बैठक घेऊन कोणाकडे कोणता विभाग आहे याची माहिती घेतली. या वेळी फार कमी अधिकाºयांशी त्यांनी संवाद साधला.
दोन तासांच्या बैठकीत त्यांनी कोरोनाविषयी आढावा घेतला असून, अधिकाºयांना त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनादेखील केल्या. शहरातील दुकानदार पुढील तीन दिवस स्वत:हून बंद करत असतील तर ठीक आहे. मात्र, जे दुकानदार दुकाने बंद करणार नाहीत अशांवर कारवाई करा, असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले आहेत. महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावादेखील त्यांनी घेतला असून, यामध्ये नागरिकांना प्रवेश बंद करण्याबरोबरच मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालयात काटेकोरपणे ५० टक्के हजेरी लावण्याचे आदेश दिले.
प्रसार माध्यमांना भेटणे टाळले
सकाळी लवकरच आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणाºया सिंघल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना मात्र भेटणे टाळले. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन सर्वच स्तरातून होत असल्याने प्रसारमाध्यमातून होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यांनी ही भेट टाळली. याशिवाय अधिकाºयांची बैठक घेतानाही त्यांनी कार्यालयात एकदम गर्दी होऊ नये म्हणून काही मोजक्या अधिकाºयांचीच बैठक त्यांनी घेतली.