कोरोनाने केली ‘शिवनेरी’ची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:43+5:302021-09-16T04:50:43+5:30

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसलादेखील ...

Corona's 'Shivneri' is in financial trouble | कोरोनाने केली ‘शिवनेरी’ची आर्थिक कोंडी

कोरोनाने केली ‘शिवनेरी’ची आर्थिक कोंडी

Next

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसलादेखील याचा फटका बसला आहे. एरव्ही शिवनेरी बसचा ठाणे - पुणे मार्ग फायद्याचा ठरत होता. मात्र करोनाच्या महामारीत हा खर्चीक ठरू लागला आहे. ठाणे -पुणेकरांच्या आवडीच्या बसमध्ये प्रवासीसंख्या कमी झाली असून, रोज मिळणाऱ्या प्रतिकिलोमीटर ८४ रुपये उत्पन्नात घट होऊन ते अवघे ४० रुपयांवर आले आहे. बसची संख्या कमी होऊनदेखील त्या दरमहा ८१ हजार किमी धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर बस सोडायच्या कशा, असा प्रश्न एसटी महामंडळाला सतावत आहे.

एसटीचे कर्मचारी पोटाला चिमटा काढून दिवसरात्र कामासाठी झटत आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळाला नाही म्हणून बस अजून तरी थांबली नसून, ठाणे - पुणे शिवनेरी बस आजदेखील प्रवाशांना चांगली सेवा देत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये बसचे भारमान ५९.९२ टक्के होते आणि जुलै २०२१ महिन्यात भारमान ३३.६५ टक्क्यांवर आल्याची माहिती एसटीने दिली आहे. पूर्वी ठाणे - पुणे मार्गावर शिवनेरी आठ बस धावत होत्या. यामुळे दरमहा साधारण ८४ लाख रुपये उत्पन्न मिळायचे. आधी फायद्यात असणारा हा मार्ग आता तोट्यात आला आहे. प्रवासीसंख्या कमी झाल्यामुळे या मार्गावर पाच बस मिळून दहा फेऱ्या होत आहेत. सुमारे ८१ हजार किमी धावून अवघे ३२.४६ लाख रुपयांचे उत्पन्न जुलै २०२१ या महिन्यात मिळाले. म्हणजे नेहमीच्या उत्पन्नापेक्षा अडीचपट घट असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोरोनाकाळात अनेकांचे वर्क फ्रॉम होम असल्याने याचा मोठा फटका शिवनेरीला बसला आहे. पूर्वी प्रतिकिलोमीटरला ८३.८२ रुपये मिळायचे, तेच आता ३९.९८ रुपये मिळतात. त्यामुळे शिवनेरी बसला मोठा फटका बसला आहे.

Web Title: Corona's 'Shivneri' is in financial trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.