कल्याण-डोंबिवलीत दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:10 AM2020-08-09T00:10:15+5:302020-08-09T00:10:25+5:30
हंड्यांना मागणीच नाही; कुंभारांमध्ये चिंतेचे वातावरण
कल्याण : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दहीहंडीच्या उत्सवाला सरकारी यंत्रणांकडून परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे दहीहंडीसाठी लागणारी हंडी तयार करणारे शहरातील कुंभारवाड्यातील कुंभार यंदा चिंतातुर आहेत. यंदा हंडीची विक्री होईल का, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
कोरोना रोखण्यात अद्याप सरकारी व आरोग्य यंत्रणेला यश आलेले नाही. सध्या लॉकडाऊन शिथिल केले असले, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. श्रावणात विविध सणांची रेलचेल असते. त्याचबरोबर गणेशोत्सवाचीही चर्चा सुरू झाली आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी गाड्या सोडा, दुकानदारांसाठी असलेला सम-विषम तारखेचा नियम रद्द करा, अशा विविध मागण्या विविध स्तरांतून केल्या जात आहेत. मात्र, कुंभारांसाठी कोणी काही बोलण्यास तयार नाही.
गणेशमूर्ती तसेच दहीहंडीसाठी हंड्या, नवरात्रासाठी गरबा, पणत्या तयार करण्यात कल्याणमधील कुंभारवाड्याचे नाव प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीला काही अंशी मागणी असली, तरी मोठ्या मूर्ती तयार करण्यात आलेल्या नाहीत. गणेशोत्सवापूर्वी १२ आॅगस्टला दहीहंडी आहे. मात्र, हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यास सरकारी यंत्रणांकडून परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे यंदा तयार केलेल्या हंड्या पडून राहणार आहेत. हंडीला मागणीच नसल्याचे कुंभारवाड्यातील कारागीर धनाजी कुंभार यांनी सांगितले.
दरवर्षी मोठ्या स्वरूपात सार्वजनिक ठिकाणी व गल्लीबोळांतील बालगोपाळ मित्र मंडळांकडून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी लहान, मोठी हंडी बांधली जाते. गेल्या वर्षी ५०० हंड्या विकल्या गेल्या होत्या. यंदा हंडीची एकही आॅर्डर नाही. त्यामुळे तयार केलेल्या हंडीचे करायचे काय, असा प्रश्न कुंभारवाड्यातील कारागिरांना सतावत आहे.