कोरोनाविषयक नियमांना ठाण्यात तिलांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:15 AM2021-02-18T05:15:48+5:302021-02-18T05:15:48+5:30
सार्वजनिक ठिकाणी गर्दी, हॉटेल, मॉल, दुकाने या ठिकाणी मागील काही महिन्यांपूर्वी सॅनिटायझरचा वापर केला जात होता. परंतु आता काही ...
सार्वजनिक ठिकाणी गर्दी, हॉटेल, मॉल, दुकाने या ठिकाणी मागील काही महिन्यांपूर्वी सॅनिटायझरचा वापर केला जात होता. परंतु आता काही ठिकाणांवरून ते हद्दपार झाले आहे. मार्केटमध्ये गर्दी वाढत असून, मास्कचा वापरही कमी झाला आहे. मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई थंडावली आहे. यापूर्वी एखाद्या ठिकाणी रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत किंवा झोपडपट्टीचा भाग सील केला जात होता. आता तसेदेखील केले जात नाही. अशातच ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहेत. परंतु शहरात अद्यापही तशा प्रकारे शाळा, महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. दुसरीकडे देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरातही भक्तांची गर्दी सण, उत्सवाला दिसून आली. माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तांनी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसत होते.
यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याची बाब प्रकर्षाने दिसून येत आहे. हॉटेल, मॉल, दुकाने या ठिकाणी येणारे नागरिक मास्कचा वापर किंवा फिजकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीत. याबाबत पोलीस विभाग व महापालिकेने संयुक्तरीत्या कारवाई करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचादेखील शोध घेण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.