CoronaVirus : 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यास खासदार कपिल पाटील यांच्याकडून १ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:51 PM2020-03-31T12:51:37+5:302020-03-31T13:07:59+5:30
coronavirus : या निधीचा भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी वापर केला जाणार आहे.
डोंबिवली : जिल्ह्यातील काही शहर वगळता अन्यत्र अद्याप 'कोरोना'चा संसर्ग झाला नसला, तरी भविष्यातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी सहायता निधीकडे प्रदान केला आहे. त्यातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात 'कोरोना'विरोधात विजय मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
कोरोनाने जग हादरले आहे. भारतालाही मोठा तडाखा बसण्याची भीती आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांत खारीचा वाटा म्हणून खासदार कपिल पाटील यांनी खासदार निधीतून १ कोटी रुपये व आपला एक महिन्याचा पगार दिला. या निधीचा भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी वापर केला जाणार आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकसंख्या मोठी आहे. भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायात हजारो कामगार आहेत. या कामगारांमध्ये संसर्ग होण्याची भीती आहे. सुदैवाने अद्याप भिवंडीत एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खासदार कपिल पाटील यांच्याबरोबरच भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत केली जात आहे.
अडचणीतील कामगारांना मदत
भिवंडीत मजुरीसाठी आलेले कामगार अडकले असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हादसिंग पटेल, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रदीपकुमार सिंग, राजेंद्र कुशवाह यांनी खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार पाटील यांच्या सुचनेनंतर भाजपाचे कार्यकर्ते व कपिल पाटील फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडचणीत कुटुंबांना मदत केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.