Coronavirus : ठाण्यात व्यापाऱ्यांचा १०० टक्के बंद, पोलिसांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 02:50 AM2020-03-21T02:50:20+5:302020-03-21T02:50:34+5:30
महापालिकेने शहरातील फेरीवाले, आठवडेबाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यावर आता कारवाई सुरू झाली आहे.
ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे स्टेशन, गोखले रोड आणि राममारुती रोडवरील सुमारे अडीच हजार दुकानदारांनी तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी नौपाडा आणि स्टेशन परिसरात १०० टक्के दुकाने बंद होती. यामधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळल्या होत्या. मात्र, घोडबंदर परिसरात दुकाने उघडीच होती. जे दुकानदार नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर महापालिका पोलिसांमार्फत कारवाई करणार आहे.
महापालिकेने शहरातील फेरीवाले, आठवडेबाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यावर आता कारवाई सुरू झाली आहे. दुसरीकडे शहरातील दुकानदारांनी गुरुवारी पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत दुकाने बंद ठेवण्याची भूमिका घेतली. त्यानुसार शुक्रवारी नौपाड्यातील गोखले रोड, राममारुती रोड आणि स्टेशन परिसरातील सर्वच दुकानदारांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. या बंदमधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या सुमारास नेहमीच गजबजून जाणाºा जांभळीनाका ते स्टेशन परिसरात शुक्रवारी शुकशुकाट दिसून आला. केवळ सार्वजनिक वाहतूक वगळता ठाणेकर नागरिक फारसे रस्त्यावर आल्याचे दिसून आले नाहीत. तर हीच परिस्थिती नौपाडा भागातही दिसून आली. या ठिकाणीही शुकशुकाट दिसून आला. दुसरीकडे गरज असेल तरच ठाणेकरांनी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका प्रशासनाने केले आहे.
रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी, तत्पूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील दुकानदारांनी शुक्रवार, शनिवार अणि रविवार असे तीन दिवस आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट मालकांनीदेखील शुक्रवारी बैठक घेऊन या बंदमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले. यासंदर्भात भविष्यात येणाºया आदेशांचे पालनही केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
कोरोनाबाधित महिलेची तपासणी करणा-या डॉक्टरची चाचणी
अंबरनाथ : कोरोनाबाधित महिलेवर उपचार करणा-या अंबरनाथच्या डॉक्टरचीही तपासणी करण्यात आली आहे. उल्हासनगरमधील ज्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला, ती उपचारासाठी अंबरनाथमधील डॉक्टरांकडे आली होती. त्यामुळे तेदेखील बाधित आहेत की नाही, याची तपासणी करण्यात येत आहे. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. उल्हासनगरची कोरोनाबाधित महिला ज्याज्या व्यक्तींच्या संपर्कात आली, त्यांचीत्यांची तपासणी करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. त्यानुसार, अंबरनाथमधील संबंधित डॉक्टरांचीदेखील तपासणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे डॉक्टर आणि अंबरनाथकरही चिंतेत आहेत. दरम्यान, अंबरनाथ पश्चिम भागातील एका वसाहतीत संशयित रुग्ण असल्याची तक्रार प्रशासनाकडे आली. प्रशासनाने या व्यक्तीला तपासणीसाठी कक्षात ठेवले आहे.
ठाण्यातील ब्युटीपार्लरसह सलून आणि स्पा सेंटरही बंद
ठाणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे शहरातील सलून, स्पा, ब्युटी पार्लर आदी बंद ठेवण्याचा निर्णय श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघ ठाणे शाखेने घेतला आहे. जोपर्यंत शासन पूर्णत: ठाणे कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करीत नाही, तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. कोरोना ही जागतिक समस्या झालेली असून, या व्हायरसने बाधित झालेल्या रु ग्णांची संख्या देशात आणि राज्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघ ठाणे शाखेने एक बैठक घेतली. या बैठकीत ठाणे शहरातील सर्व केश कर्तनालये सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचा ठराव पारित केला. यानुसार शहरातील या सर्व आस्थापना शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य शासनाकडून जोपर्यंत ठाणे शहर पूर्णत: कोरोनामुक्त झाल्याची घोषणा होत नाही, तोपर्यंत सर्व पार्लर, सलून बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे पुढील काही दिवस शहरातील केश कर्तनालय सलून, स्पा, ब्युटी पार्लर आदी लॉकडाउन राहणार आहेत.
क्लासमध्ये मागच्या दाराने विद्यार्थ्यांची गर्दी
कल्याण : शाळा, महापविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश असतानाही हरताळ येथील पश्चिमेतील टिळक चौक परिसरात असणाºया एका खासगी कोचिंग क्लासमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी उपस्थित असल्याचे उघड झाले. पोलिसांनी संबंधितांना कडक समज देऊन घरी पाठवले.
सर्व शाळा, महाविद्यालये यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश खासगी क्लासनाही लागू आहेत; परंतु एका खासगी क्लासकडून याचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, क्लासचे मुख्य शटर बंद ठेवून मागच्या दाराने या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. शटर बंद असूनही जोरजोराने हसण्या-खिदळण्याचे आवाज तेथून येणाºया जाणाऱ्यांना येत होते. याबाबतची माहिती जागरूक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.
बार, ऑर्केस्ट्रा, मंगलकार्यालये बंद
डोंबिवली : कोरोनाच्या धर्तीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालय कल्याण परिमंडळ झोन ३ अंतर्गत ४७ बार, २३ आॅर्केस्ट्रा बंद करण्याची कार्यवाही विभागीय पोलीस आयुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
कल्याण-डोंबिवलीतील आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गर्दीची ठिकाणे जिथे आहेत, ती तातडीने बंद करण्यात आली. त्यामध्ये बार, आॅर्केस्ट्रासह १०७ जिम, ५३ खासगी क्लास, ३१ मंगल कार्यालये बंद करण्यात आली आहेत. सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आदेश पानसरे यांनी सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांना दिले होते. त्यानुसार राऊत यांनी डोंबिवलीमधील मानपाडा, रामनगर, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व गर्दीच्या ठिकाणी ही पावले उचलली. मानपाडा रस्ता येथे डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर आणि अन्य पोलीस ठाण्यातील अधिका-यांसोबत जनजागृती अभियान राबवले. त्यामध्ये नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळणे, गर्दी न करणे आणि बार, आॅर्केस्ट्रा बंद ठेवणे, पानटप-यांवरील बंदीबाबतचे नियम सांगितले. आदेशांचे उल्लंघन केल्यास काटेकोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिका-यांना दिले आहेत.
जेवण, पार्सलला परवानगी
नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांनाही बंदी घातली आहे. यातून अत्यावश्यक किराणा सामान, दूध व भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू व औषधालये (मेडिकल) वगळण्यात आले आहेत. हॉटेल, बीअरबार, वाइनशॉपमधून पार्सल, जेवण घरी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दुकानांसह खासगी आस्थापना व शेअर रिक्षा-टॅक्सींना बंदी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठाणे जिल्ह्यातील शेअर रिक्षा, ओला, उबेर टॅक्सीसह ग्रामीण भागातील काळ्या-पिवळ्या जीपने होणारी एकत्रित प्रवासी वाहतूक, व्यावसायिक वाहने आदीवर बंदी घालण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी दिले. शिवाय सर्व दुकाने व आस्थापनांनाही बंदी घातली असून यातून मेडिकल दुकाने, दूध, भाजीपाला, यांना वगळण्यात आले आहे.तर हॉटेल, बार, वाइनशॉप मधून पार्सल नेण्यास परवागनी देण्यात आली आहे. शेअर रिक्षा, टॅक्सीमधून सर्व सामान्य प्रवासी शेअरिंगद्वारे शहरांतर्गत व ग्रामीण भागात ये-जा करत असतात, त्या अनुषंगाने प्रवासादरम्यान कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशी शेअरिंग प्रवासी वाहतूक करणारी वाहने ३१ मार्चपर्यंत व त्या पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी शुक्रवारपासून तत्काळ लागू केली आहे.
गर्दी, धूम्रपान करणा-या २० ते २५ मुलामुलींवर गुन्हा दाखल
गुरुवारी मध्यरात्रीनंतर ठाण्यातील घोडबंदर रोडवरील साईनगर येथे २० ते २५ मुलामुलींनी धूम्रपान करण्यासाठी गर्दी केली. त्यांना हटकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला त्यांनी शिवीगाळ केली. मद्यप्राशन करून मुलींशी हुज्जत घातल्याचा आरोपही पोलिसांवर केला. यावेळचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला असून, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अद्यापही कोणालाही अटक केली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.
कासारवडवली पोलिसांची व्हॅन घटनास्थळी पोहोचली असता, तुम्ही बाहेरही आणि कंपनीच्या आवारातही धूम्रपान करू देत नाही, असा आक्षेप घेऊन मुला व मुलींनी मोबाइलमध्ये चित्रण करणाºया हवालदार खरात यांना शिवीगाळ केली. मास्क लावलेल्या खरात यांनी मद्यपान केल्याचा आरोप करून या ठिकाणी घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओमध्ये काही मुली व मुले चक्क पोलिसांनाच धक्काबुक्की करत आहेत. पोलीस त्यांना काहीतरी समजावताना दिसत आहेत. या प्रकरणी महाराष्टÑ पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३), १३५ भादवी कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.