coronavirus : कल्याण डोंबिवलीत आढळले कोरोनाचे 12 नवे रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 97 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 05:03 PM2020-04-22T17:03:42+5:302020-04-22T17:04:48+5:30
महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत कल्याण पेक्षा डोंबिवली आघाडीवर आहे.
कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाचे आणखीन 12 नवे रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 97 झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या 12 रुग्णांमध्ये पोलिस, परिचारिका व डायलेसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे.
महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत कल्याण पेक्षा डोंबिवली आघाडीवर आहे. आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपैकी कोरोना बाधित रुग्णांच्या सहवासात आल्याने डोंबिवली पूर्वेतील 51 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 27 वर्षाचा तरुण या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 59 व 51 वर्षीय दोन महिला व 71 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. हे तिघेही जण डायलेसिस उपचार घेणारे आहेत. सरकारच्या आरोग्य खात्याच्या नियमानुसार डायलेसिस रुग्णांनी कोरोनाची चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार या तिघांची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कल्याण पूर्वेतील 44 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली होती. तो 15 एप्रिलपासून मुबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला उपचारांती 21 एप्रिल रोजी घरी पाठविण्यात आले आहे. 36 वर्षीय पोलिसाची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली. तो कल्याण पूर्वेत राहणारा आहे. 57 वर्षीय परिचारिका शासकीय रुग्णालयात काम करते. ती कल्याण पूर्वेत राहते. तिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेतील 37 वर्षे पुरुषाला व आंबिवलीतील 37 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली. हे दोघेही ठाणे येथील काम करणा-या कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासात आले होते. महापालिका हद्दीत आत्तार्पय त कोरोनाग्रस्त तीन रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. उपचारांती आत्तार्पयत 33 जणांना घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 61 आहे. त्यापैकी 29 रुग्ण हे कल्याण शीळ रोडलगत असलेल्या पडले गावातील नियॉन रुग्णालयात उपचार घेत आहेत. 11 रुग्णांवर डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. उर्वरीत 21 रुग्ण हे मुंबईतील विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत आहेत.